Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुसळधार पावसाने नाशिक जलमय; धरणे ओसंडली, खबरदारीचे आवाहन

मुसळधार पावसाने नाशिक जलमय; धरणे ओसंडली, खबरदारीचे आवाहन

नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून काही धरणांतून नियंत्रित पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरीसह अनेक नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून नदीकाठच्या सखल भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक आणि जळगाव जिल्ह्यालाही चांगलेच झोडपून काढले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देत हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कुमार राजपूतयांनी आज मालेगाव नांदगाव बागलाण इगतपुरी कळवण, त्र्यंबकेश्वर पेठ आणि सुरगाणा तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे

हवामान विभागाकडून आज नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. नाशिकसह जळगाव जिल्ह्यातील विविध धरणांतून वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निसर्गाचे भरभरून दान लाभलेल्या नाशिकच्या चांदवडतालुक्यातील राजदेरवाडी व इंद्राईवाडी डोंगर रांगावरील सर्व धबधबे प्रवाहित झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल मध्यरात्रीपासून हरणबारी धरण परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मोसम नदीला पूर आला असून मुल्हेर येथील मोसम नदीवरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे मांगीतुंगी, माळीवाडे, शेवरे, देवठाण, जैतापूरसह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच गुजरातला जोडणाऱ्या मुल्हेर-हरणबारी मार्गावरील नाल्यावर पाणी आल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे. प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar