Dailyhunt
नाशिक : रिक्षा प्रवासात वृद्धेच्या आठ तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी

नाशिक : रिक्षा प्रवासात वृद्धेच्या आठ तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- रिक्षाने प्रवास करणार्‍या धुळ्याच्या वृद्धेच्या पर्समधील आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात इसमांनी चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी विजया दिलीप वाणी (वय 62, रा. आनंदनगर, इंदिरा गार्डनजवळ, मु. पो. ता. जि. धुळे) या काल (दि. 1) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास धुळे येथून एस. टी. महामंडळाच्या बसने नाशिक येथे आल्या व बळी मंदिर स्टॉप येथे उतरल्या. तेथून पॅसेंजर ऑटो रिक्षाने द्वारका सर्कल येथे गेल्या. तेथून जावई सौरभ राणे यांच्यासोबत पेठेनगर येथे मुलीच्या घरी गेल्या.

या प्रवासादरम्यान कोणी तरी अज्ञात इसमाने वाणी यांच्या पर्समध्ये असलेली 2 लाख 80 हजार रुपये किमतीची 70 ग्रॅम वजनाची सोन्याची कंठी माळ व 40 हजार रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे टॉप्स असे 3 लाख 20 हजार रुपये किमतीचे दागिने नजर चुकवून चोरून नेले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फुंदे करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar