Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिकची साक्षी चांडक संपूर्ण देशात सीए इंटर मध्ये प्रथम

नाशिकची साक्षी चांडक संपूर्ण देशात सीए इंटर मध्ये प्रथम

नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

नाशिक : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) तर्फे सप्टेंबर २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, या परीक्षेत नाशिकच्या साक्षी चांडक हिने ५०२ गुण (८३.६७ टक्के) मिळवत अखिल भारतीय स्तरावर संयुक्त प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या उल्लेखनीय यशामुळे नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ICAI च्या अधिकृत प्रसिद्धिपत्रकानुसार, यंदाच्या परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह आणि नाशिकची साक्षी चांडक या दोघांनीही प्रत्येकी ५०२ गुण (८३.६७ टक्के) मिळवले असून, त्यांनी अखिल भारतीय स्तरावर संयुक्त प्रथम क्रमांक मिळवला आहे. चेन्नईची श्रुती व्ही हिने ४९२ गुण (८२ टक्के) मिळवत द्वितीय क्रमांक, तर सुरतचा प्रेम अग्रवाल याने ४९० गुण (८१.६७ टक्के) मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे.

सीए इंटरमिजिएट परीक्षेत ग्रुप १ मध्ये १,००,३०१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २३,२१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी २३.१४ इतकी आहे. ग्रुप २ मध्ये ६८,४०० विद्यार्थ्यांपैकी १२,९३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी १८.९२ आहे. दोन्ही ग्रुपची परीक्षा दिलेल्या ३८,३३९ विद्यार्थ्यांपैकी ५,०६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी १३.२१ इतकी आहे. या परीक्षेत एकूण १४,८१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मे 2026 च्या परीक्षेत नाशिकची साक्षी जैन सीए फौंडेशन परीक्षेत प्रथम आली होती व आता सप्टेंबर 2026 च्या परीक्षेत नाशिकची साक्षी चांडक संपूर्ण देशात सीए इंटरमिजिएट परीक्षेत प्रथम आली म्हणजेच दोन्ही साक्षीने नाशिकचे नाव संपूर्ण देशभरात रोशन केले आहे. साक्षी चांडक हिच्या या यशामुळे सीए क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे. तिच्या यशामागे असलेली मेहनत, अभ्यासातील सातत्य आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा ही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या या यशामुळे नाशिकमधील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकच्या साक्षी चांडक हिचे या उज्ज्वल यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, तिच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

- प्रा. सीए लोकेश पारख

कॉमर्स व सीए मार्गदर्शक

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar