Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सांगली अत्याचार प्रकरण ; चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून निघृण हत्या ! नराधमाला ''ही'' -  शिक्षा

सांगली अत्याचार प्रकरण ; चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून निघृण हत्या ! नराधमाला ''ही'' - शिक्षा

राज्यातील अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून लहान लहान चिमुरड्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. दरम्यान दीड वर्षाआधी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी येथे चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता.

या प्रकरणात आता आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पुण्याच्या नसरापूर येथील घटनेनंतर राज्यात चिमुरड्या मुलीच्या अत्याचार प्रकरणात अवघ्या दीड वर्षात जलदगती न्यायालयात सुनावणी पूर्ण होऊन फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली ही दुसरी मोठी घटना ठरली आहे. या प्रकरणी सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी सरकारची बाजू मांडली.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी येथे चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी बालिकेचा मृतदेह लोखंडी पेटीत लपवून ठेवणाऱ्या पांडुरंग सोमना कळ्ळी (वय 46) या आरोपीला सांगलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयातील बाल अत्याचार प्रतिबंधक विशेष न्यायालयाने दोषी ठरवून ही कठोर शिक्षा सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुरडी ही आपल्या आजीकडे राहत होती. तिची आई कर्नाटकातील मुधोळ येथे माहेरी गेली होती, तर वडील बांधकाम मजुरीसाठी रत्नागिरीत गेले होते. 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी ही मुलगी घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाली. कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी शोध घेऊनही ती न सापडल्याने पोलिसांना तात्काळ पाचारण करण्यात आले.

हेही वाचा ; संतापजनक ! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपल्याने तरुणाचा गेला जीव ; पहा VIDEO

मुलीच्या घराच्या मागे राहणारा आरोपी पांडुरंग कळ्ळी हा स्वतः गावकऱ्यांसोबत मुलीच्या शोधमोहिमेत सामील झाला होता. मात्र, त्याच्या संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांनी त्याची चौकशी केली. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने पीडितेचा मृतदेह आपल्या घरातील लोखंडी पेटीत प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवल्याचे उघडकीस आले.

या क्रूर घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात प्रचंड संतापाची लाट पसरली होती. आरोपीला कठोर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी विविध सामाजिक संघटनांनी मोर्चे आणि आंदोलने केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या १५ दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल केले होते.

सुनावणीदरम्यान सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी आरोपीचा जुना गुन्हेगारी पार्श्वभूमीचा रेकॉर्ड न्यायालयात मांडत, अशा नराधमाला समाजाच्या हितासाठी फाशीचीच शिक्षा योग्य असल्याचे सांगत जोरदार युक्तिवाद केला. न्यायालयाने सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे पांडुरंग सोमना कळ्ळी याला दोषी ठरवून मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाचे पीडित कुटुंबासह नागरिकांनी स्वागत केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Bhramar