Dailyhunt
लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

लोणावळा, दि. 1 मे ( प्रतिनिधी ) : लोणावळा शहरात गुरुवारी ( दि. 30 एप्रिल ) सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात बोअरवेलच्या गाडीने दुचाकीला मागून धडक दिल्याने १७ वर्षीय आदिवासी तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर संतप्त आदिवासी बांधवांनी महामार्ग रोखून आंदोलन केल्याने तब्बल पाच तास वाहतूक विस्कळीत झाली होती. रात्री १२.३० वाजता पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात यश मिळवले.

मृत तरुणाचे नाव मनिष पिंट्या वाघमारे (वय १७, रा. कुने नामा ठाकरवाडी) असे असून, या अपघातात अक्षय कोळी हा तरुण जखमी झाला आहे. जखमीवर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी लोणावळ्याच्या दिशेने जात असताना बोअरवेलच्या गाडीने मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की मनिष वाघमारे याचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर परिसरातील आदिवासी तरुण-तरुणींसह अनेक बांधव मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले.

मृत तरुण आदिवासी समाजातील असल्यामुळे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संतप्त जमावाने महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला परिस्थिती तणावपूर्ण होती; मात्र पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली व अखेर मध्यरात्री १२.३० वाजता वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

दरम्यान, संबंधित वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लोणावळा पोलीस करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Maval