Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन - २०३५' कार्यशाळेचे उद्घाटन ; चर्चासत्रात शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सखोल विचारमंथन

'तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन - २०३५' कार्यशाळेचे उद्घाटन ; चर्चासत्रात शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सखोल विचारमंथन

Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने आयोजित ‘तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन २०३५’ या महत्त्वपूर्ण कार्यशाळा व चर्चासत्रात आमदार सुनील शेळके यांनी सहभाग घेत तळेगावच्या भविष्यातील शाश्वत, नागरिककेंद्रित आणि सर्वसमावेशक विकासाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तळेगावचा विकास केवळ आधुनिक इमारतींपुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करणारा, पर्यावरणपूरक आणि नियोजनबद्ध असावा, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

यावेळी बोलताना आमदार शेळके म्हणाले की, तळेगाव हे शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि वाहतूक या सर्व क्षेत्रांत झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे आगामी काळातील लोकसंख्या, औद्योगिक वाढ आणि नागरी गरजा लक्षात घेऊन शहराचा दीर्घकालीन विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे. भविष्यातील तळेगाव अधिक सक्षम, सुबक आणि राहण्यायोग्य शहर म्हणून उभे राहावे, यासाठी आजच ठोस नियोजन करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहराच्या विकासासाठी आंद्रा धरणातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा, एमआयडीसीला जोडणाऱ्या रस्त्यांचे सक्षम जाळे, तळ्यापासून सुरू होणाऱ्या नाल्यालगत आकर्षक जॉगिंग ट्रॅक व पर्यटन विकास, मुख्य अंतर्गत रस्त्यांचे सुशोभीकरण, वाहतूक कोंडीमुक्ती, स्वच्छता व्यवस्थेचे बळकटीकरण, हरित क्षेत्रांची वाढ, डिजिटल सुविधा, तसेच स्थानिक रोजगारनिर्मिती या बाबींना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, उद्योजक आणि सर्व समाजघटकांच्या गरजा लक्षात घेऊन २०३५ चा विकास आराखडा तयार करण्यात येत असल्याचे नमूद करत, हा आराखडा तळेगावच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास आमदार शेळके यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या सूचना आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून तयार होणारा हा आराखडा राज्यातील इतर नगरपालिकांसाठीही आदर्श ठरेल, असे त्यांनी सांगितले.

या कार्यशाळेस तैवानच्या I.C.A. चे संचालक लॉरेन्स फिलब्रुक, शंकर जाधव, अर्चना देशमुख, नगराध्यक्ष संतोष दाभाडे, सत्यशीलराजे दाभाडे सरकार, वडगाव नगराध्यक्षा अबोली ढोरे, गणेश भेगडे, गणेश खांडगे, गणेश काकडे, नगरसेवक, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चासत्रात शहराच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासासाठी विविध विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात आले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप
'गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी' … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Maval