Wednesday, 20 Nov, 8.15 am प्रभात

मुख्य पान
2016 पासूनची सर्व अनधिकृत बांधकामे पाडणार

महापालिकेची मोहीम : अधिकारी, कर्मचाऱ्यांचे होणार निलंबन


अडथळा आणल्यास लोकप्रतिनिधींवरही होणार कारवाई

पिंपरी - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक आचारसंहिते दरम्यान अधिकारी-कर्मचारी व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत शहरात अनेकांनी अनधिकृत बांधकामे उभारली आहेत. ही सर्व बांधकामे निष्कासित करण्यात येणार असून 1 जानेवारी 2016 नंतर झालेले प्रत्येक अनधिकृत बांधकाम पाडण्यात येईल, अशी माहिती आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. अनधिकृत बांधकामे शोधण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार असून, सध्या सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांसाठी जबाबदार महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही आयुक्‍त हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याचा दिखावा पालिका अधिकारी करत असताना शहरात दिवसेंदिवस राजकीय आशिर्वादाने शेकडो बांधकामे होत आहेत. पाणी पुरवठ्या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत अनधिकृत बांधकामांच्या प्रश्‍नावरही आयुक्तांनी कारवाईची मोहीम जाहीर केली. याबाबत अधिक माहिती देताना हर्डीकर म्हणाले, निवडणुकीच्या कालावधीत अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असतात, याचा गैरफायदा घेऊन शहरात नव्याने अनधिकृत बांधकामे झाली आहेत. ही सर्वच्या सर्व बांधकामे पाडण्याचे धोरण महापालिकेने आखले असून, त्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे.

1 जानेवारी 2016 पूर्वीची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचे शासनाचे धोरण आहे. ही बाब सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास करून 2016 पूर्वीच्या बांधकामांवर कारवाई करण्याचे धोरण आहे. मात्र 1 जानेवारी 2016 नंतरच्या प्रत्येक बांधकामावर कारवाई करण्यात येणार आहे. सध्या जर बांधकाम सुरू असेल तर त्या ठिकाणी महापालिकेचे कार्यरत असलेले बीट मार्शल, स्थापत्य सहायक, कनिष्ठ अभियंता, उपअभियंता तसेच कार्यकारी अभियंता जबाबदार धरण्यात येणार आहे. बांधकाम सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर दक्षता पथकामार्फत संबंधित बांधकाची शहानिशा करून तथ्य आढळल्यास पालिकेच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही आयुक्‍त नमूद केले आहे.

प्राधिकरण हद्दीतील बांधकांमांवरही नजर
प्राधिकरणातील बांधकामांची परवानगी देण्याचे अधिकार महापालिका प्राप्त झाले आहेत. शिवाय अनेक भागांचे हस्तांतरण प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असली तरी प्राधिकरणाच्या हद्दीत अनधिकृत बांधकामे होणार नाहीत, याची खबरदारी महापालिकेच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाईल, मात्र महापालिकेचीच जबाबदारी असल्याने पालिकेचे अधिकारीही अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी काम करतील, असेही आयुक्‍तांनी यावेळी सांगितले.

…तर त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई
अनधिकृत बांधकाम होणार नाही, याची काळजी प्रशासन घेणार असून अनधिकृत बांधकामांवर कारवाईही करणार आहे. मात्र कारवाई दरम्यान कोणत्याही लोकप्रतिनिधीने बांधकाम पाडण्यासाठी अटकाव अथवा अडथळा केल्यास संबंधित लोकप्रतिनिधीवरही कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती आयुक्त हर्डीकर यांनी दिली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top