Tuesday, 22 Sep, 5.05 am प्रभात

मुख्य बातम्या
67 वर्षांपूर्वी प्रभात : आचार्य अत्रे, सुखदुःखे आणि विनोद

परवा सायंकाळी पुणें मुक्‍कामी, आचार्य अत्रे यांचा, 'मी कसा झालो' या ग्रंथाच्या निर्मितीबद्दल जाहीर सत्कार झाला. त्या प्रसंगी आचार्य अत्रे म्हणाले- ''पुण्याने मला हार घातले आहेत आणि मारही दिला आहे. दोन्हीचे मला सुखदुःख नाही.'

यावरून आचार्यांची मानसिक अवस्था किती श्रेष्ठ दर्जाला पोचली आहे याची कल्पना येते. हर्ष उत्पन्न करणाऱ्या गोष्टी घडल्या असता संयम व विवेक यांचा आश्रय करून हर्ष आवरून धरणे आणि दुःख देणाऱ्या घटना घडल्या असतांही त्याच संयमाने व विवेकाने वागून शांतपणे दुःख सोसणे, हे थोरामोठ्यांचे लक्षण आहे. म्हणूनच अशा लोकांना मोठेपण प्राप्त होते. संकटसमयी धीर न सोडणे हे जसे मोठेपणाचे लक्षण आहे तसेच अनुरूप घटना घडली असता हुरळून न जाणे व बेहोष न होणे हेही मोठेपणाचेच लक्षण आहे.

परंतु आचार्य अत्रे यांची मानसिक व आत्मिक पातळी याहूनही वरिष्ठ दर्जाची आहे. सुख व दुःख या दोन्ही गोष्टी त्यांनी एकाच स्वरूपाच्या करून टाकल्या आहेत. चांगल्या गोष्टीचे त्यांना सुख वाटत नाही व वाईट गोष्टीमुळे दुःख होत नाही. चांगल्या गोष्टी घडोत अथवा वाईट गोष्टी घडोत; दोन्ही त्यांना सारख्याच वाटतात.

इत्यर्थ हा की, आचार्य अत्रे यांच्या मनःस्थितीचा विचार करावयाचे म्हटले तर सुख व दुःख यामधील आणि सुखदायक घटना आणि दुःखदायक घटना यामधील फरक जाणण्याची त्यांची शक्‍तीच नाहीशी झाली आहे-अथवा त्यांनी ती नाहीशी करून टाकली आहे. अर्थात, संयम, विवेक इत्यादिकांचा आश्रय करण्याची व हर्षाचा अथवा शोकाचा आवेग आवरून धरण्याची त्यांना गरजच कधी भासत नाही. हे आवेग जर उत्पन्नच होत नाहीत तर ते आवरण्याचे कारण काय?

त्याच भाषणात आचार्य अत्रे यांनी असे सांगितले की हास्यरस हा जीवनाचा धागा आहे; विनोद हे जीवनाचे महान तत्त्वज्ञान आहे. सुखें व दुःखें यामधील फरक ज्यांच्या बाबतीत नाहीसा झाला आहे त्यांना विनोदाची व हास्यरसाची अनुभूती यावी हे विस्मयजनक होय!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top