Thursday, 17 Sep, 5.06 am प्रभात

मुख्य बातम्या
67 वर्षांपूर्वी प्रभात : गुरुवार, ता. 17 माहे सप्टेंबर सन 1953

मायदेश व स्त्रीत्व यांचा झालेला बहुमान

श्रीमती पंडित यांचे कृतज्ञ उद्‌गार

राष्ट्रसंघ, ता. 16 :- ''माझ्यावर सोपविण्यात आलेली नवी जबाबदारी अधिकांत अधिक चांगल्यारीतीने पार पाडण्याचा मी प्रयत्न करीन,' अशा आशयाचे उद्‌गार श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांनी त्यांची राष्ट्रसंघाच्या अध्यक्षपदावर निवड झाल्यावर काढले.

त्या पुढे म्हणाल्या, ''आपण माझी या अध्यक्षपदावर निवड करून माझ्या मायभूमीचाच बहुमान केला आहे. राष्ट्रसंघाचा अधिकार सर्व देशांत मानला जावा आणि त्या द्वारे जगात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठीच हिंदुस्थानचे अविरत प्रयत्न चालले आहेत.

माझ्या मायदेशाबरोबर आपण स्त्रीत्वाचाही बहुमान केला आहे. राष्ट्रसंघाचे ध्येय तडीला जावे म्हणून स्त्रियांनी आपापला वाटा उचलला असून त्याचेच आज हे चीज झाले आहे.' राष्ट्रसंघाने वर्णद्वेषावर उपाययोजना केली पाहिजे आणि जगात चाललेल्या शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेला प्रतिबंध केला पाहिजे अशीही त्यांनी शेवटी सूचना केली.

फारुखची राजवट स्थापण्याचा कट
देशद्रोह्यांवर खटले भरणार

कैरो, ता. 16 :- इजिप्शीयन देशद्रोह्यांवरील खटल्यांचा तडकाफडकी निकाल लागावा आणि त्या निकालाविरुद्ध त्यांना अपील करता येऊ नये, या हेतूने इजिप्शीयन सरकारने एक न्यायमंडळ नेमलें आहे. हे मंडळ नेमल्याचे इजिप्तचे राष्ट्रीय मार्गदर्शन खात्याचे मंत्री सला सलेम यांनी इजिप्तच्या मुक्‍तता चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या पुढे बोलताना सांगितले.

ते म्हणाले, ''इजिप्तमध्ये फारुख राजाची राजवट पुनः स्थापन करावी आणि मुक्‍तता चळवळीच्या कार्यकर्त्यांचे खून करावे, या हेतूने केलेला एक कटही उघडकीय आला आहे.'

मध्यपूर्व संरक्षण करार

पुढे ते म्हणाले, ''मध्यपूर्व संरक्षण करारात इजिप्त सहभागी होणार नाही, असे सांगून त्यांनी अरब राष्ट्रांच्या परस्पर संरक्षणाच्या 1950 सालच्या कराराला पाठिंबा दिला. ते म्हणाले, ''इजिप्तच्या भूमीवरील परदेशी सैन्य काढून घ्यावे, या शर्तीवर इजिप्त कोणत्याही पाश्‍चिमात्य राष्ट्रांच्या संरक्षण करारांत सामील होणार नाही.'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top