Monday, 21 Sep, 5.05 am प्रभात

मुख्य बातम्या
67 वर्षांपूर्वी प्रभात : "पुण्याने मला हार घातले, तसाच मला मारही दिला!'

पुणें, ता. 20 :- ''पुण्याचे माझ्यावर प्रेम आहे. माझेही पुण्यावर तसेच प्रेम आहे. पुण्याने मला हार घातले आहेत आणि मारही दिला आहे. दोन्हीचे मला सुखदुःख नाही. लो. टिळक, गोखले, गडकरी, शिवरामपंत परांजपे, न. चिं. केळकर यांच्यासारखी माणसे असणारे पुणे हे माझ्या जीवनाचे विद्यापीठ होते. पुण्याचे ऋण मी कधीच विसरणार नाही,' असे उद्‌गार आचार्य अत्रे यांनी आज गोखले हॉलमधील त्यांच्या सत्कार सभेत काढले. अध्यक्षस्थानी महापौर नलावडे होते.

परचुरे यांच्या प्रकाशन संस्थेतर्फे प्रसिद्ध झालेल्या 'मी कसा झालो' या ग्रंथाचे मौलिक लेखन केल्याबद्दल अत्रे यांचा सत्कार करण्यात आला. गोखले हॉलची जागा अपुरी पडली इतकी तुफान गर्दी व्याख्यानास झाली होती. रस्त्यापर्यंत माणसं फुलली होती. सुमारे 2-3 हजार स्त्री-पुरुषांचा जमाव हजर होता. प्रथम श्री. माटे, तळवलकर व निरंतर यांची ग्रंथाच्या गुणगौरवपर भाषणे झाली.

अत्रे यांचे सुमारे दीड तास हास्यरसाने ओथंबलेले भाषण झाले. अनेक आख्यायिका, आठवणी व अनुभव सांगून त्यांनी हास्यरसात श्रोत्यांना बुडवून टाकले. मानवतेच्या सहानुभूतीतून विनोद निर्मिती होते असे सांगून ते म्हणाले, ''हास्यरंग हा जीवनाचा धाक आहे.' आपल्या स्थित्यंतरासंबंधी बोलतांना त्यांनी सांगितले की, मी उगवत्या सूर्याला अर्ध्य देणारा मनुष्य असून सद्‌गुणांचा उपासक आहे. विनोदी वक्‍तृत्व कै. दादासाहेब खापडे व अच्युतराव कोल्हटकर यांच्यापासून मी शिकलो.

कै. कोल्हटकरांच्या प्रासंगिक विनोदाचा एक मासला त्यांनी सांगितला. एकदा कोल्हटकर एका स्टेशनवर गाडीची वाट पहात बाकावर बसले होते. स्टेशनवरच्या अधिकाऱ्याने त्यांना हटकले व तो बाक 'Reserved For Ladies' (फक्‍त स्त्रियांसाठी राखीव) असल्याचे सांगितले. तेव्हा कोल्हटकर उत्तरले,
'I Am Also Reserved For Ladies' (मीसुद्धा स्त्रियांसाठी राखीव आहे) विनोद हे जीवनाचे महान तत्त्वज्ञान असल्याचे सांगून अत्रे यांनी ज्ञानेश्‍वर, तुकाराम, विनोबा यांच्या सर्वोभूतीपर परमेश्‍वर पाहण्याच्या संदेशाचा साक्षात्कार झाल्याचे निवेदन करून भाषण संपविले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top