Monday, 23 Sep, 11.01 am प्रभात

शीर्ष बातम्या
आश्‍वासनांचीच जंत्री, विकासाची आश्‍वासनेच!

अशोक चव्हाणांसह शिवसेना किंवा भाजप यांच्या दृष्टीने नांदेड जिल्ह्यातील आणखी एक 'हॉट सीट' म्हणजे मुखेड मतदारसंघ. पूर्वी शिवसेना आणि 'साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करायचं' या लाटेत कॉंग्रेसने 2009मध्ये जिंकलेला हा मतदारसंघ 2014मध्ये भाजपने मोठ्या मताधिक्‍याने जिंकला. यात गोविंद राठोड हे 73 हजार 291 मतांनी विजयी झाले, पण शपथविधी होण्यापूर्वीच त्यांचे रेल्वे प्रवासात निधन झाले. त्यानंतर पोटनिवडणुकीत गोविंद राठोड यांचे चिरंजीव डॉ. तुषार हे 47 हजार 248 मतांनी विजयी झाले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला सुमारे 20 हजारांचे मताधिक्‍य आहे. त्यामुळे मतदार सोबत राहात असूनदेखील कोणत्याही आमदाराला मतदारसंघात अजूनही विकास करता आलेला नाही. दरवेळी केवळ आश्‍वासने पदी पडतात आणि विकास मात्र हरवून जातो. भले मग सत्ता कोणाचीही असो.

दिवाळीनंतर मुखेड मतदारसंघात फेरफटका मारल्यास वाड्या-वस्ती-तांडे आणि गावेसुद्धा ओसाड दिसतात. कारण, येथील नागरिक रोजगारासाठी हमखास हैदराबाद, पुणे, औंरगाबादकडे धाव घेतात. कारण, आलटून पालटून कोणत्याही पक्षाचा आमदार येथे निवडून आला, तरी मतदारसंघात कायमच अंधार असतो. ना कोणता मोठा उद्योग, ना सिंचनाची सुविधा. उच्च शिक्षण म्हटल्यास फार तर बी.ए, बी.एसस्सी, बी.कॉम.पर्यंतची सोय. त्यामुळे बेरोजगारी पाचवीलाच पूजलेली. मतदारसंघातील तरुण शिक्षण आणि नोकरीसाठी कायम भटकंतीवर असतात. भौगोलिकदृष्ट्या संपूर्ण पठारी प्रदेश असल्याने सिंचनाचीही सुविधा नाही. 1985मध्ये जेमतेम एका प्रकल्पाला मंजुरी मिळाली, पण काही अंशी वगळता पुनर्वसन आणि प्रकल्पाचे काम रखडले आहे. निधीची अडचण असल्याने निवडणुका कोणत्याही असो 'लेंडी प्रकल्प पूर्ण करू' हे आश्‍वासन दिलं जातं. निवडणुका होतात आणि पुढची 5 वर्षे प्रकल्पाचं काम इंचभरही पुढं सरकत नाही. कारण, राजकीय अनास्था आणि प्रशासकीय लालफितशाही या नागरिकांच्या नशिबी आहे. राठोड यांनी त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात रोजगाराच्या निर्मितीसाठी काही प्रयत्न केले असतील, तरीही प्रत्यक्षात मतदारसंघात रोजगार निर्मिती झालेली दिसत नाही. शेती हा मुख्य उद्योग असल्याने सिंचन महत्वाचे होते, पण विद्यमान आमदारांच्या काळात सिंचनाच्या नव्या कोणत्याही योजना आल्या नाहीत. हेच मुद्दे राठोड यांच्या विरोधातील आहेत. त्यामुळे डॉ. तुषार राठोड यांना मतदारसंघाचा 'आजार' कळलाच नाही, असे चित्र आहे. 2019 साठी भाजपकडून इच्छुकांची यादी मोठी आहे. विद्यमान आमदार राठोड यांच्यासह हिंगोली नगरपालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी रामदास पाटील, गणाचार्य मठ संस्थानचे मठाधिपती डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज अशी तगडी नावे आहेत.

2009मध्ये विजयी झालेले हनुमंत पाटील बेटमोगरेकर हे अशोक चव्हाणांचे आहेत. त्यामुळे चव्हाणांच्या मदतीने मतदारसंघाचे चित्र बदलेल, अशी आशा होती पण ती सपशेल फोल ठरली. हनुमंत पाटील यांचे बंधू दिलीप पाटील हे कॉंग्रेसचे जिल्हा परिषद राहिले आहेत. तेदेखील विकासाच्याबाबतीत अपयशी ठरले. परिणामी, 2014 च्या विधानसभा आणि 2015 च्या पोटनिवडणुकीत देखील हनुमंत पाटील यांचा पराभव झाला. शिवाय या बंधूंच्या काळात रोजगार हमी योजनेच्या कामात घोटाळे झाल्याच्या तक्रारी झाल्या. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध नकारात्मक वातावरण तयार झाले. त्यानंतर विधानासभा, जिल्हा परिषद-पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकीत भाजपला समाधानकारक यश मिळाले. पण, विकासाचा सूर काही सापडलेला नाही.

या मतदारसंघात मराठा, बंजारा, धनगर, हटकर यांच्यासह लिंगायत समाज मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीदेखील येथून दोन हात करण्याच्या तयारीत आहे. तसे झाल्यास कॉंग्रेससह भाजपलाही मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top