Thursday, 06 Aug, 12.32 am प्रभात

ताज्या बातम्या
आयसीसी वर्ल्ड सिरीज : आयर्लंडचा इंग्लंडवर विक्रमी विजय

स्टर्लिंग व बालबर्नीची दमदार शतके

साऊदम्पटन -विश्‍वकरंडक विजेत्या इंग्लंडवर नवख्या आयर्लंडने त्रिशतकी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत विक्रमी विजयाची नोंद केली. या सामन्यात आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंग व बालबर्नी यांनी दमदार शतके झळकावली.

इंग्लंडने इयान मॉर्गनच्या शतकाच्या जोरावर 328 धावांचा डोंगर उभा केला. आयर्लंडने केवळ 3 गडी गमावून हे आव्हान पार केले. आयसीसी वर्ल्ड सिरीजमधील ही तीन सामन्यांची मालिका इंग्लंडने 2-1 अशी जिंकली असली तरीही आयर्लंडच्या इतिहासात हा विक्रमी विजय ठरला आहे. यजमान इंग्लंडविरुद्ध त्रिशतकी धावांचा पाठलाग यापूर्वी केवळ भारतीय संघाने केला होता.

या मालिकेतील अखेरच्या एकदिवसीय लढतीत पॉल स्टर्लिंग आणि बालबर्नी यांनी शतकी खेळी केली व 7 गडी राखून विजय प्राप्त केला. इंग्लंडने इयान मॉर्गनच्या शतकाच्या जोरावर 328 धावा उभारल्या होत्या. आयर्लंडने या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत केवळ 1 चेंडू बाकी ठेवून स्वप्नवत विजय मिळवला. स्टर्लिंगने 142 तर, बालबर्नीने 113 धावांची खेळी केली. आयर्लंडचा इंग्लंडच्या भूमीवरील पहिलाच विजय आहे.

इंग्लंडविरुद्ध जागतिक क्रिकेटमध्ये 320 पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य असताना विजय मिळवण्याबाबत आयर्लंडने भारतीय संघाशी बरोबरी केली आहे. भारताने अशी कामगिरी आतापर्यंत दोन वेळा केली. आयर्लंडचा संघ इंग्लंडमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वात मोठा विजय मिळवणारा संघ ठरला आहे. याआधी भारतीय संघाने 2002 साली नेटवेस्ट मालिकेतील अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध 326 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड - 49.5 षटकांत सर्वबाद 328. (इयान मॉर्गन 106, टॉम बॅन्टन 58, डेव्हिड विली 51, क्रेग यंग 3/53). आयर्लंड - 49.5 षटकांत 3 बाद 329. (पॉल स्टर्लिंग 142, ऍण्ड्य्रू बालबर्नी 113, डेव्हिड विली 1/70).

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top