Wednesday, 05 May, 5.00 am प्रभात

मुख्य बातम्या
अबाऊट टर्न | बबल-गम

- हिमांशु

बायोबबल म्हणजे काय रे काऊ..? हा प्रश्‍न आम्हाला तो बबल फुटल्यावरच पडला. तोपर्यंत सोफ्यावर आरामात बसून किंवा लोळत आयपीएलची मॅच पाहणं हा लॉकडाऊनमधला मोठा आधार आहे, एवढंच माहीत होतं. अर्थात, प्रश्‍न पडतच नव्हते असं नाही; परंतु 'देश करोनाच्या विळख्यात असताना आयपीएलची चैन नेमकी कुणासाठी?' असले 'तद्दन डावे' प्रश्‍न मात्र पडले नव्हते.

कोट्यवधी रुपये मोजून 'विकत घेतलेले' हे खेळाडू किती रिस्क घेऊन खेळतात ना, असं वाटत होतं. त्यांच्या संरक्षणाची काय तजवीज केली असेल, असाही प्रश्‍न पडायचा; पण कोलकात्याच्या संघातले दोन जण करोना पॉझिटिव्ह सापडले आणि पाठोपाठ 'बायोबबल फुटला,' अशी बातमी आली तेव्हा आम्ही थोडी अधिक माहिती घेतली. बायोबबलचे जे वर्णन आम्हाला ऐकायला-वाचायला मिळालं, त्यातून एवढंच समजलं की या बबलमध्ये राहणं सोपं नाही.

इतके दिवस तर नाहीच नाही! लॉकडाऊनच्या काळात सगळेच व्यवहार थंड पडलेले असताना किमान क्रीडाप्रकार सुरू राहावेत, महत्त्वाच्या स्पर्धा व्हाव्यात आणि सक्‍तीनं घरी बसलेल्या लोकांना थोडी करमणूक मिळावी यासाठी हा 'जैविक बुडबुडा' तयार केला जातो. जिथं क्रीडा स्पर्धा सुरू असेल त्या संकुलाच्या परिसरात मोजक्‍या लोकांनाच प्रवेश दिला जातो आणि त्यातल्या प्रत्येकाची आरटी-पीसीआर निगेटिव्ह यावी लागते, अशी प्राथमिक माहिती मिळाली.

बायोबबल हा प्रकार सुरक्षित वाटत असला तरी त्यात राहणाऱ्या खेळाडूंना अनेक नियमांचं पालन करावं लागतं आणि मॅच संपल्यानंतर ज्यांना 'चौथा अंक' महत्त्वाचा वाटतो, त्यांना ही शिस्त टोचू लागते. मानसिकदृष्ट्या ही खेळाडूची कसोटीच असते. कुठे हात लावायचा आणि कुठे हात लावायचा नाही, इथंपासून नियमांना सुरुवात होते. त्याचप्रमाणं कुणाशी बोलायचं आणि कुणाशी बोलायचं नाही, याचेही ठरवून दिलेले नियम असतात. यातल्या कुठल्याही नियमाचं उल्लंघन खेळाडूकडून झालं तर लगेच त्याचं निलंबन केलं जातं म्हणे!

थोडक्‍यात, या जैविक बुडबुड्यात राहणं म्हणजे इमोशनल अत्याचारच! आपण ज्यांचे सिक्‍सर पाहून तुडुंब खूश होतो, ते लोक पॅव्हेलियनमध्ये गेल्यानंतर कसे जगतात, याची माहिती एक सामना रद्द झाल्यानंतरच घ्यावीशी वाटली; किंबहुना तशी गरज निर्माण झाली म्हणून घेतली. संपूर्ण सॅनिटाइज केलेला आणि विशिष्ट लोकांनाच परवानगी असलेला परिसर… प्रवासाची वेळ आल्यास वाहनं, विमानंही पूर्णपणे निर्जंतुक केलेली असावी लागतात. ज्या हॉटेलमध्ये खेळाडूंची राहण्याची सोय केलेली असते त्यातला काही भाग आणि स्टेडियमचा ठराविक भाग या बबलमध्ये समाविष्ट असतो. देशांतर्गत किंवा परदेश प्रवास करायचा असेल तर प्रत्येक वेळी आरटी-पीसीआर चाचणी केली जाते.

एका आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पार्किंग लॉटचा समावेश बायोबबलमध्ये नव्हता म्हणून खेळाडूंना हॉटेलपासून स्टेडियमपर्यंत आणि तिथून पुन्हा हॉटेलपर्यंत सोडण्याची व्यवस्था केली होती. बबलसारख्या व्यवस्था अर्थातच खूप खर्चिक असणार; पण त्याहून अधिक सतावू लागलेला प्रश्‍न असा की, अशा कडेकोट बंदोबस्तात राहून ही मंडळी सिक्‍सर कसे मारतात? माणसाला अष्टावधानी करणाऱ्या या बबलमध्ये राहणाऱ्यांची अवस्था 'तेलाचा एकही थेंब सांडू नको,' अशी ईश्‍वरी आज्ञा असलेल्या नारदमुनींसारखीच होत असणार!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat

related stories

Top