Monday, 21 Sep, 5.16 am प्रभात

ताज्या बातम्या
अबाऊट टर्न : दुसरी लाट?

-हिमांशू

करोना विषाणूचा खेळ बिग बॉसच्या गेमपेक्षाही अधिक अनाकलनीय होत चाललाय. कडेकोट लॉकडाऊनचे दिवस सरले आणि आता अनलॉकचे एकामागून एक टप्पे सुरू आहेत. त्याच वेळी रुग्णांची संख्या मात्र वाढत चालली असून, अनेक ठिकाणी रुग्णालयात बेड मिळेनासे झालेत. ऑक्‍सिजनअभावी काहीजणांना प्राणाला मुकावं लागतंय. व्हेन्टिलेटर तर चैनीची वस्तू बनलीय.

दुसरीकडे, एसटीच्या बसमधून शंभर टक्‍के प्रवासी क्षमतेसह वाहतूक सुुरू झालीय. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात आपापल्या गावी गेलेले परप्रांतीय मजूर कामावर परतू लागलेत. अर्थात, नागरिकांचा जीव वाचवणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच अर्थव्यवस्था सुरळीत करणंही आवश्‍यक आहे. त्यामुळे गणिती पद्धतीने अनुमान काढून निर्णय घेतले जात असावेत, असा विचार मनात घोळत होता. तेवढ्यात पश्‍चिमेकडील देशांमधून आता एक चिंताजनक बातमी आलीय.

युरोपातल्या अनेक देशांमध्ये आता करोनाची दुसरी लाट सुरू झालीय. स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये अनेक ठिकाणी पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे नियम लागू करण्यात येत आहेत. स्पेनमध्ये सोमवारपासून प्रवास आणि सामाजिक कार्यक्रमांवरही बंधने येणार आहेत. फ्रान्समध्येही पुन्हा एकदा दिवसाकाठी दहा हजार रुग्ण सापडू लागल्यामुळे सगळे हादरले होते. शुक्रवारी एकाच दिवशी तेरा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाल्यामुळे मार्सेली, नीस अशा अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध जारी करण्यात आलेत. अर्थमंत्री ब्रूनो ले मेयर स्वतः पॉझिटिव्ह आहेत.

ब्रिटनमध्येही रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे करोनाची दुसरी लाट अटळ आहे, असं सांगून पंतप्रधानांनी अनेक ठिकाणी कडक लॉकडाऊन जाहीर केलाय. चेक रिपब्लिक, नेदरलॅंड्‌स अशा देशांमधूनही नागरिकांवर वेगवेगळे निर्बंध पुन्हा घातले गेल्याच्या बातम्या येताहेत. काही देशांनी तर घराबाहेरच नव्हे तर घरातसुद्धा दोन व्यक्‍तींमध्ये दीड मीटरचे अंतर ठेवायचा सल्ला लोकांना दिलाय. जानेवारीपासून जगाच्या मागे हात धुऊन लागलेला हा विषाणू साडेआठ महिने उलटूनसुद्धा आपला पाठलाग सोडायला तयार नाही. वेगवेगळ्या ठिकाणी लसी तयार झाल्याच्या बातम्या येत असल्या तरी चाचण्यांचे तीन टप्पे पूर्ण करून लस आपल्यांपर्यंत पोहोचायला पुढचे वर्ष उगवेल, असे सांगितलं जातंय.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, लस प्रभावी ठरेल असंही छातीठोकपणे सांगता येत नाही. एकीकडे आपण या विषाणूसोबत जगायला शिकलं पाहिजे, असं सांगितलं जातंय तर दुसरीकडे विषाणू अनेकांचा जीव घेताना दिसतोय. आपल्याकडे दुहेरी संकट म्हणजे सोशल मीडियावरून एकीकडे 'सांभाळून राहा' म्हणणाऱ्यांची तर दुसरीकडे 'हमखास इलाज' सांगणाऱ्यांची झालेली गर्दी. आपल्याकडे रुग्ण बरे होण्याचा दर चांगला आहे हे खरं; पण आधीपासूनच व्याधीग्रस्त असणाऱ्यांना हमखास तोडगा सांगणारे सोशल मीडियावरही भेटत नाहीत.

आपल्याकडे महत्त्वाची समस्या अशी आहे की, 'घाबरू नका' असंही कुणाला सांगता येत नाही आणि 'जरा सीरियसली घ्या' असंही म्हणण्याची सोय नाही. तमाशाने बिघडणार नाही आणि कीर्तनाने सुधारणार नाही, असे लोक आहोत आपण; परंतु गांभीर्यानं बोलायचं झाल्यास युरोपातली दुसरी लाट पाहून चिंता वाटते, हे नक्‍की! भारतात विषाणूचा उद्रेक मर्यादित होता तोपर्यंतच पाश्‍चात्य देशांकडे आपलं लक्ष होतं. आता ते पुन्हा वेधलं गेलंय. अशा लाटा उसळतच राहिल्या तर अवघड आहे!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top