Editorial : सध्या पाच राज्यांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यातील आसाममधील (Editorial) निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहोचलेली आहे.
भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी आपली सगळी ताकद त्या निवडणुकीत (Editorial) झोकलेली असतानाच काँग्रेसने अचानक भाजपचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांच्यावर सनसनाटी आरोप करून या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण केला आहे.
मुख्यमंत्री हिमंता यांच्या पत्नीकडे तीन देशांचे पासपोर्ट असून या दोन्ही पती-पत्नीच्या नावाने दुबई आणि अमेरिकेत तब्बल 56 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या कंपन्यांची मालकी आहे, असा आरोप काँग्रेसतर्फे (Editorial) पत्रकार परिषदेत करण्यात आला. हे आरोप करताना त्यांनी सगळी कागदपत्रे पत्रकारांपुढे सादर केली. तीन देशांचे तीन वेगवेगळे पासपोर्टही सादर करण्यात आले.
यातले दोन पासपोर्ट इस्लामिक देशांचे आहेत हे विशेष. या पत्रकार परिषदेतील आरोपाला अजून भाजपकडून अधिकृत उत्तर आलेले नाही किंबहुना या पत्रकार परिषदेतील आरोपांना प्रसिद्धी माध्यमात स्थानच मिळू नये अशी पद्धतशीर रचना केली गेली आणि ही बातमी जशी टीव्ही मीडियातून गायब केली गेली तशीच ती प्रिंट मीडियामधूनही गायब करण्यात भाजपने यश मिळवले. पण काँग्रेसने पुन्हा आसामातही पत्रकार परिषद घेऊन तेच आरोप नव्याने केले आहेत.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा आणि आसामातील काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी पत्रकार परिषद घेऊन हेच आरोप नव्याने करताना निवडणुकीचे वातावरण चांगलेच ढवळून काढले. या आरोपांना तोंड देणे भाजपला अवघड झाले आहे. मुळात स्वतः मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडे तीन देशांचे पासपोर्ट असणे हा अत्यंत गंभीर मामला असून, या देशातील कायद्यानुसार कोणत्याही नागरिकाला दुहेरी नागरिकत्व धारण करता येत नाही. त्यामुळे मुळात मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच भारतीय नागरिक आहेत की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.
तो हिमंता यांच्या बाबतीत यासाठी महत्त्वाचा आहे की त्यांनी स्वतःच काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांच्या पत्नीच्या संदर्भात असा आरोप केला होता; पण त्या अनुषंगाने त्यांनी कोणतेही पुरावे दिले नव्हते. पण आज मात्र काँग्रेसने पुराव्यासह हे आरोप करून मुख्यमंत्री हिमंता यांना चांगलेच कचाट्यात पकडले आहे. विदेशातील गुंतवणुकीच्या संबंधात जे पुरावे काँग्रेसने सादर केले आहेत त्याचा उल्लेख निवडणूक अर्जाच्या वेळी मुख्यमंत्री हिमंता यांनी सादर केलेला नाही. त्यामुळे ही माहिती दडवल्याबद्दल थेट मुख्यमंत्रीच निवडणूक लढवायला अपात्र ठरू शकतात अशी परिस्थिती आहे.
त्यामुळे काँग्रेसने आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनाही या विषयावरून घेरले आहे. बिहारप्रमाणेच आसाम सरकारने ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात थेट मोठी आर्थिक रक्कम टाकून निवडणुकीवर एकतर्फी प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात जाईल असे वातावरण झालेले असतानाच काँग्रेसनेही आसामात प्रचाराचा जोरदार धुरळा उडवला आहे.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सभेला मोठा जनसागर जमत असल्याच्या व्हिडिओ चित्रफिती सध्या सोशल मीडियात गाजत आहेत. केवळ मैदानी प्रचारावरच काँग्रेसने भर दिलेला नाही तर मुख्यमंत्री हिमंता यांच्यावर पुराव्यासह आरोपांची सरबत्ती करत त्यांना चांगलेच घेरले असल्याने ही निवडणूक आता वेगळ्याच वळणावर गेलेली दिसते.
मुख्यमंत्री हिमंता हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळीही त्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, एवढेच नव्हे तर त्यांच्या भ्रष्टाचाराची स्वतंत्र पुस्तिकाही भारतीय जनता पक्षाने त्यावेळी प्रकाशित केली होती. पण नंतर भाजपने त्यांनाच आसामचे मुख्यमंत्री पद बहाल केले आणि गेली दहा वर्षे ते आसामचे मुख्यमंत्री आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गळ्यातले ते ताईत बनले आहेत.
ईशान्येकडील राज्याचे भाजपचे मुख्य सूत्रधार म्हणूनही हिमंता बिस्व सरमा हे नावारूपाला आलेले आहेत. त्यांचा या निवडणुकीत जर पराभव झाला तर भारतीय जनता पक्षाला केवळ आसामच नव्हे तर संपूर्ण ईशान्य भारतातील राजकारणात मोठा धक्का बसू शकतो. आसामातील निवडणुकीचे वातावरण नेमके काय आहे याचा अंदाज सध्या बहुधा भाजपच्या नेत्यांनाही आलेला असावा, त्यामुळे त्यांनी आसामवर लक्ष केंद्रित न करता आपली सगळी शक्ती पश्चिम बंगालवर केंद्रित केलेली दिसते. त्यामुळे आसामचा किल्ला हिमंता यांना एक हाती लढवावा लागत आहे.
आसामात घुसखोरीचा मुद्दा नेहमीच निवडणुकीचा मुद्दा ठरतो. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीतही घुसखोरीचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. भारतीय जनता पक्षाने यापूर्वीच्या दोन निवडणुकांमध्येही आसामात हा मुख्य प्रचाराचा मुद्दा केला होता. आता त्यांनी पुन्हा घुसखोरीचा मुद्दा पुढे केल्यानंतर त्याला तेथे फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.
तशातच आता काँग्रेसने थेट मुख्यमंत्र्यांनाच घेरले असल्याने आणि त्यांच्यावर पुराव्यानिशी गंभीर आरोप केल्याने या निवडणुकीत भाजपचे काय होणार याची उत्सुकता राजकीय निरीक्षकांना लागून राहिली आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर सांगण्याचा मुद्दा एवढाच की, आसामच्या मुख्यमंत्र्यांवर झालेले हे आरोप हे केवळ निवडणुकीच्या राजकारणातले आरोप न समजता त्या आरोपांची तपास यंत्रणाकडून पूर्ण शहानिशा होण्याची गरज आहे.
विदेशात हजारो कोटी रुपयांची मालमत्ता जमा करणारे हे राजकारणी मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, ते मोकाट सुटता कामा नयेत अशीच जनतेची अपेक्षा आहे. उद्या आसामात पुन्हा हिमंता सरमा जिंकले, तर त्यांच्यावरील आरोप नजरेआड होण्याचा धोका अधिक आहे. पण हे सगळे मुद्दे नजरेआड करण्याइतके किरकोळ नक्कीच नाहीत.

