Wednesday, 15 Sep, 9.08 am प्रभात

ताज्या बातम्या
अग्रलेख : अण्णांची सावध सक्रियता!

सन 2011 साली लोकपालसाठीचे आंदोलन करून तत्कालीन यूपीए सरकारला भंडावून सोडणारे अण्णा हजारे हे बऱ्याच दिवसांच्या मौनानंतर आता पुन्हा सक्रिय झाल्यासारखे वाटू लागले आहेत. मात्र, त्यांची यावेळची सक्रियता बरीच सावध स्वरूपाची आहे. पूर्वीसारखे ते केंद्र सरकारवर तुटून पडताना दिसत नाहीत.

भाजप सरकारने त्यांच्यावर नेमकी काय मोहिनी घातली याचा उलगडा होत नाही, पण ते राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकार विरुद्ध मात्र पुन्हा आंदोलनाच्या तयारीला लागले आहेत. तसा इशाराही त्यांनी दिला आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात अण्णांनी आवाज उठवावा, असे आज असंख्य विषय आहेत. पण त्याविषयी मात्र अण्णा हिरीरीने काही बोलताना दिसत नाहीत. त्यामुळेच अण्णा झोपी गेले असल्याची टीका मध्यंतरी त्यांच्यावर चारही बाजूंनी सुरू होती, पण त्यालाही उत्तर देताना ते दिसले नाहीत.

केंद्र सरकारच्या संबंधात अण्णांनी जाणीवपूर्वक जी मौनी भूमिका घेतली आहे त्याच्या विरोधात राळेगणला जाऊन आंदोलन करण्यासाठी मध्यंतरी काही कार्यकर्ते गेले होते. त्यांनी अण्णांना सरळ प्रश्‍न केला की, मोदी सरकारच्या गैरकारभाराच्या अनेक कथा सगळीकडे पसरल्या असताना तुम्ही त्यांच्याविरुद्ध आंदोलन का करीत नाही. त्यावेळी अण्णांनी एखाद्या कसबी राजकारण्यासारखे उत्तर दिले. त्यांनी म्हटले आहे की, आजवर मी खूप आंदोलने केली, आता माझे वय झाले आहे, मी एकटा किती लढणार?

आता तरुणांनीच लढ्याचे रणशिंग फुंकावे मी त्यांना पाठिंबा देईन, असे सांगून अण्णांनी या कार्यकर्त्यांची बोळवण केली. केंद्राच्या विरोधात बोलताना सावधगिरी बाळगणारे अण्णा राज्य सरकारच्या विरोधात मात्र आक्रमक भूमिका घेताना दिसतात. मध्यंतरी राज्यातील मंदिरे उघडण्याच्या संबंधातही त्यांनी काही भाष्य केल्याचे छापून आले होते. पण अण्णांनी मोदी सरकारच्या विरोधात मात्र, काही ब्र काढला नव्हता.

काल राळेगणमध्ये विविध राज्यांतील कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सांगता समारंभावेळी त्यांनी मोदी सरकारच्या संबंधात एक सावध वक्‍तव्य केले. त्यांनी म्हटले आहे की, 75 वर्षांपूर्वी देशाबाहेरील लोकांनी देश लुटला. आता देशातील लोकच आपल्या देशाला लुटत आहेत. कोणत्याही पक्षाचे राज्यकर्ते असोत त्यांच्यावर दबाव ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन असले पाहिजे.

कार्यकर्ता आणि जनता जागी झाली तर मोदींचे सरकारही पडू शकते, असे अण्णांनी म्हटले आहे. म्हणजेच अण्णांनी मोदी सरकार विरुद्धच्या आंदोलनाबाबत पुन्हा दुसऱ्याच्याच खांद्यावर बंदूक ठेवली आहे. जनता जागी झाली तर मोदी सरकार पडू शकते हे अगदीच मोघम वाक्‍य झाले. लोक असेही म्हणू शकतात की, राज्यातील मवाळ स्वभावाच्या सरकारविरोधात अण्णा जोराने सक्रिय होऊ इच्छितात, त्यांच्या विरोधात ते पुन्हा आंदोलनाचाही स्पष्ट इशारा देतात पण हीच कृती मोदी सरकारच्या विरोधात करा म्हटले तर ते सावधगिरी बाळगतात हे कसे?

या प्रश्‍नाचे अण्णांकडून नेमके उत्तर मिळायला हवे. मोदी सरकारच्या विरोधात अण्णांनी आजवर होताहोईल तो मौनच बाळगणे पसंत केले आहे, असे गेल्या काही काळात स्पष्ट दिसले आहे. अण्णांची हीच भूमिका अनेकांना खटकत आली आहे. दिल्लीतील शेतकरी आज इतके महिने आंदोलन करीत आहेत, त्यांच्या पाठिंब्याबाबतही अण्णांनी मोघमच वक्‍तव्ये केली आहेत, त्यांनी ठामपणे आंदोलनाला पाठिंबा देऊन मोदी सरकारला स्पष्ट इशारा द्यायला हवा होता.

आज देशात अण्णा हजारे यांच्यासारखे मोठी नैतिक शक्‍ती असलेले खूपच कमी नेते आहेत. त्यामुळे आज केंद्र सरकारच्या अनेक निर्णयांच्या विरोधात लोकांना अण्णांचे नेतृत्व हवे आहे. पण अण्णा त्यासाठी कधी राजी होतील हा प्रश्‍न आहे. देशात महागाईचा कहर झाला आहे, इंधन दरवाढीनेही लोकांचे कंबरडे मोडले आहे. राष्ट्रीय मालमत्ता धडाधड विकायला काढण्यात आल्या आहेत. हे सारे अण्णांच्या आंदोलनाशी संबंधित विषय आहेत.

लोकपाल हा अण्णांचा आवडता विषय आहे. यूपीए सरकारच्या काळातच देशात लोकपाल यंत्रणेची स्थापना झाली आहे. पण मोदी सरकारच्या काळात लोकपालच्या नियुक्‍तीचा विषय बरीच वर्षे रखडून ठेवण्यात आला होता. नंतर न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे अखेर देशात लोकपालाची नियुक्‍ती झाली; पण आज ही यंत्रणा बहुतांशी निष्क्रिय आहे. त्या विरोधात अण्णांनी बोलणे अपेक्षित आहे. लोकपालची यंत्रणा स्थापन झाली तर देशातील भ्रष्टाचार 60 टक्‍के कमी होईल, असे अण्णा नेहमीच सांगत आले आहेत.

पण आज लोकपाल यंत्रणा स्थापन होऊनही त्यांचे नेमके काय चालले आहे हे कोणालाच कळेनासे झाले आहे. अण्णांनी निदान तो विषय तरी पुन्हा नेटाने हाती घेऊन ही यंत्रणा अधिक व्यापक आणि सक्रिय करायला हवी आहे. देशात सध्या केंद्र सरकारकडून एक आगळेच राजकीय दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. ईडी, सीबीआयचा ज्या प्रकारे वापर सुरू आहे त्यामुळे विरोधकांमधील अनेक नेते गप्पगार बसले आहेत. माध्यमेही शांत आहे.

अशा वातावरणात केंद्र सरकारच्या लोकविरोधी नीतीच्या संबंधात आवाज उठवणाऱ्या नेतृत्वाची मोठी गरज जनतेला वाटत आहे. हे काम करण्यास विरोधी पक्षही सक्षम राहिलेले नाहीत. अशा काळात अण्णा हजारेंसारख्या नैतिक नेतृत्वाची मोठी गरज असताना अण्णांनी मात्र नाहक सावधपणाने वागणे सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनाही पसंत पडलेले दिसत नाही. अण्णांचे आज वय झाले आहे,

त्यामुळे त्यांनी लगेच केंद्राच्या विरोधात उपोषणास्त्र उपसावे असे कोणाचेही म्हणणे नाही. सगळे काही अण्णांनी एकट्यानेच करावे अशी अपेक्षाही करणे बरोबर नाही. पण राळेगणमध्ये बसूनच सरकारच्या लोकविरोधी धोरणांच्या विरोधात परखड भूमिका घेणे, सरकारला कडक शब्दांत त्यांच्या चुका दाखवून देणे, चुकीच्या धोरणांच्या संबंधात जनजागृती करणे अशी कामे करता येणे अण्णांना सहज शक्‍य आहे. अण्णांविषयी लोकांच्या मनात आजही नितांत आदरभावना आहे, त्याचा मान राखत अण्णांनी लोकचळवळ आणि प्रबोधनाला आपल्या वाणीद्वारे अधिक बळ द्यावे, ही अपेक्षा चुकीची नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top