Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अग्रलेख : शेअर बाजाराची घुसळण

अग्रलेख : शेअर बाजाराची घुसळण

Share Market : सततच्या पडझडीनंतर दिवाळीच्या आसपास शेअर बाजार(Share Market) जरा कुठे सावरत असतानाच बाजारात सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. लगेचच मंगळवारी पुन्हा तेजी दिसून आली. पण नफा वसुलीच्या लाटेतून घसरगुंडी झाल्याचे सांगितले जात असले तरी या पुढील काळात शेअर बाजाराची गुंतवणूक किती विश्वासार्ह राहील याविषयी धोक्याचीच घंटा वाजवणारे हे प्रकरण म्हणावे लागेल.

मध्यंतरी बाजारात सलग चार आठवडे तेजी दिसली होती. भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांनी त्या काळात आपली गुंतवणूक परत नेली त्यामुळे सगळीकडे हवालदिल वातावरण असतानाच नोव्हेंबर महिन्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार पुन्हा भारतीय बाजारातील गुंतवणुकीकडे परतत होते. त्यामुळे निर्देशांकाला चांगले बळ मिळत असतानाच सोमवारी शेअर बाजाराचा (Share Market) निर्देशांक सुमारे चौदाशे अंकांनी कोसळून तो 82 हजार 435 वर बंद झाला.

ही घसरण सुमारे 1.77% इतकी होती आणि त्यामुळे शेअर गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख 20 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या चार महिन्यांतील ही सर्वाधिक पडझड मानली गेली आहे. आता प्रश्न असा आहे की या पुढील काळात भारतीय शेअर बाजार नेमका कसे वळण घेईल, हा आहे. पण त्यासाठीचे जे इंडिकेटर आहेत ते फार प्रबळ आहेत असे म्हणता येणार नाही.

जागतिक शेअर बाजारात एआय कंपन्या तसेच सेमीकंडक्टर क्षेत्रात गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. भारतात या दोन्ही क्षेत्रात फारशी लाभदायी स्थिती नाही. गेल्या दोन वर्षात भारतीय शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना जेमतेम दोन ते अडीच टक्के इतकाच परतावा दिला आहे, हा सरासरी परतावा आहे. त्यामुळे तशीही या क्षेत्रातील गुंतवणूक छोट्या गुंतवणूकदारांसाठी फारशी लाभदायी नाही. त्यामुळे थेट शेअर खरेदी गुंतवणूक करण्याऐवजी छोटे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडामार्फत या बाजारात गुंतवणूक करीत असतात.

त्या म्युच्युअल फंड कंपन्यांनीही गुंतवणूकदारांना म्हणावा तितका परतावा दिलेला नाही. परंतु गुंतवणूकविषयक सल्ला देणारे तज्ज्ञ म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मोठ्या लाभासाठी कायम ठेवण्याची सूचना करत आहेत. दीर्घकालीन टप्प्यात या गुंतवणुकीतून लाभच होतो असा पूर्वानुभव असल्याने बाजारातील पडझडीमुळे घाबरून न जाता म्युच्युअल फंडातील आपली नियमित स्वरूपातील गुंतवणूक कायम ठेवावी अशी सूचना या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सातत्याने होत असल्याने येथील गुंतवणूक अजूनही काही प्रमाणात कायम आहे.

त्या आधारावर बाजारातील व्यवहार सुरू आहेत. अन्यथा भारतीय शेअर बाजार नजीकच्या काळात काही फार मोठा चमत्कार करू शकेल अशी आशा आता कोणालाही राहिलेली नाही. भारतीय कंपन्यांपुढेही सध्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीत मोठीच आव्हानात्मक स्थिती निर्माण झालेली आहे. देशाच्या आर्थिक क्षेत्रातील विविध घडामोडींचा अंदाज घेतल्यानंतर आपली स्थिती इतक्यात फार मोठ्या प्रमाणात सुधारेल असा ठाम दावा कोणीही करू शकत नाही.

त्याखेरीज भारतीय आर्थिक क्षेत्राच्या संबंधात जी आकडेवारी सरकारकडून सातत्याने प्रसिद्ध होते आहे त्यावर जगातल्या गुंतवणूकदारांचा विश्वास नाही. भारताचे जीडीपीचे आकडे कोणीही खरे मानत नाही. अशीच गत अन्य क्षेत्रातील आकडेवारी बाबतही आहे. भारतीय चलनाची स्थिती आणखी नाजूक होताना दिसत आहे, आशियातील सगळ्यात खराब कामगिरी करणारे चलन म्हणजे रुपया अशी व्याख्या सध्या केली जात आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठीचे सेंटीमेंट अजूनही तोळामासाच आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतातील सामान्य माणसाला आपली थोडी बहुत शिल्लक राहिलेली पुंजी सुरक्षितपणे नेमकी कोठे गुंतवावी याचा काहीच अंदाज लागेनासा झाला आहे. बँकांमधील एफडीच्या स्वरूपातील गुंतवणुकीवर सध्या अगदी अल्पसे व्याज मिळत आहे, पूर्वी जे व्याज 12-13 टक्क्यांवर मिळायचे ते आता जेमतेम 5-6 टक्क्यांवर आले आहे आणि चलनवाढ दराच्या तुलनेत इतक्या कमी व्याजावर बँकांमधील ठेवीवर गुंतवणूक करणे अंतिमतः नुकसानदायकच होते याचा अंदाज ठेवीदारांनाही आला आहे.

त्यामुळे मधल्या काळात हे गुंतवणूकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे मोठ्या प्रमाणात वळत होते, परंतु तेथेही सातत्याने घसरगुंडी सुरू असल्याने आणि तेथून अपेक्षित परतावा मिळत नसल्याने सोन्याच्या गुंतवणुकीकडे मध्यंतरी कल वाढला होता. पण आता सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीही कमालीच्या घसरत आहेत ही घसरण नेमकी कुठल्या पातळीपर्यंत जाईल याविषयीही कोणीही ठामपणे काहीही सांगू शकत नाही. असे सगळे प्रकार होत असताना सामान्य गुंतवणूकदार पूर्णपणे भांबावून गेला आहे.

त्याला गुंतवणुकीचा विश्वासार्ह पर्याय हवा आहे, पण तो कुठल्याच क्षेत्रात दिसत नाही अशी आजची स्थिती आहे. जमिनीत गुंतवणूक करण्याइतकी मोठी शिल्लक सामान्य माणसाच्या हातात राहात नाही, त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्र हे सामान्य माणसाच्या आज पूर्ण आवाक्याबाहेर आहे. त्याखेरीज कौटुंबिक उत्पन्न वाढण्याचीही शाश्वती (Share Market) सामान्य माणसाला राहिलेली नाही.

ही सगळी परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात केवळ बचत करून चार पैसे गाठीशी बांधून ठेवणे यावरच आता सामान्य माणसाला लक्ष केंद्रित करावे लागेल, अन्यथा आगामी काळ त्यांच्यासाठी याहीपेक्षा अवघड बनू शकतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat