Monday, 21 Oct, 9.00 am प्रभात

शीर्ष बातम्या
अकरा आमदारांसह 116 उमेदवारांचे भवितव्य मतदार राजाच्या हाती

थोरात, विखे, शिंदेंसह राजळे, कर्डिलेंची प्रतिष्ठा पणाला; जगताप, औटी, गडाख, पिचड यांचा अस्तित्वासाठी संघर्ष
नगर (प्रतिनिधी) -विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दृष्टीने अस्तित्वाची तर भाजप व शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरत असताना जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात मात्र 'काटेकी टक्‍कर' झाल्याने विद्यमान आमदारांसाठी ही निवडणूक अखेरच्या टप्प्यात अस्तित्वासाठी संघर्षाची झाली आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, जिल्ह्यात 12-0 असाच निकाल लावू अशी वल्गना करणारे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे तर राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्यामुळे आव्हान उभे ठाकलेले जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह आमदार मोनिका राजळे, आमदार शिवाजी कर्डिले यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील अकरा आमदारांसह 116 उमेदवारांचे भवित्वय उद्या मतदार राजाच्या हाती असून ते कोणाच्या बाजूने आपला कौल मतदार यंत्रात टाकणार हे 24 ऑक्‍टोबरला स्पष्ट होणार आहे.

सुरुवातीला बहुतांशी विधानसभा मतदारसंघात एकतर्फी वाटणारी निवडणूक अखेरच्या टप्प्यात चुरशी झाली. त्यात अकोले, नेवासे, पारनेर, कर्जत-जामखेड, शेवगाव- पाथर्डी, राहुरी या सहा मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे. तर संगमनेर, शिर्डी, श्रीगोंदा, या तीन मतदारसंघात एकतर्फीच निवडणूक होत असल्याचे दिसत आहे. या निवडणूक रिंगणात विद्यमान अकरा आमदार, तीन माजी आमदार, दोन जिल्हा परिषद सदस्य आपले भवितव्य अजमावत आहेत. जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघ असून त्यात भाजप आठ, शिवसेना 4, कॉंग्रेस 3 तर राष्ट्रवादी 8 व एक जागेवर राष्ट्रवादीने पुरस्कृत उमेदवार उभा केला आहे. या निवडणुकीमुळे जिल्ह्याचे राजकीय समिकरणे बदलली आहे. प्रदेशाध्यक्ष असतांनाही बाळासाहेब थोरात यांना आपल्या जिल्ह्यात केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत कॉंग्रेसची दयनीय अवस्था झाली. संगमनेर हा थोरातांचा हक्‍काचा मतदारसंघ सोडला तर अन्य शिर्डी व श्रीरामपूरमध्ये कॉंग्रेसला उमेदवार देतांना नाकीनव झाले. श्रीरामपूरमध्ये उमेदवार आयात करावा लागला. शिर्डीत विखेंच्या उमेदवारात तगडा उमेदवार न देता सामान्य कार्यकर्त्यास उमेदवारी देण्यात आली.

राष्ट्रवादीची काहीची तशीच अवस्था झाली. नेवासेत उमेदवार जाहीर करून देखील विठ्ठलराव लंघे यांनी उमेदवारीस नकार दिला. त्यामुळे या मतदारसंघात शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे उमेदवारी माजी आमदार शंकरराव गडाख यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केले. श्रीगोंद्यात विद्यमान आमदार राहुल जगताप यांनी देखील उमेदवारी नाकारल्याने ऐनवेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्‍याम शेलार यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी निवडणूक न लढण्याची भूमिका घेतल्याने केदारेश्‍वर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. प्रतापराव ढाकणे यांना उमेदवारी राष्ट्रवादीने दिली. भाजपमध्ये काही विद्यमान आमदारांची उमेदवारी कपाली जाणार असल्याची चर्चा असतांना आठ विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार जाहीर करण्यात आले.

सुरुवातीला बारा विद्यमान मतदारसंघापैकी संगमनेर वगळता उर्वरित अकरा मतदारसंघावर युतीच्या उमेदवारांचा वरचष्मा राहणार असल्याचे वाटप होते. परंतु प्रचाराचा जोर व जाहीर सभामुळे निवडणुकीची परिस्थिती बदल गेली. संगमनेर, शिर्डी व श्रीगोंदे हे तीन मतदारसंघ सोडले तर उर्वरित नऊ विधानसभा मतदारसंघात चुरस निर्माण झाली. त्यापैकी सहा मतदारसंघात तर अटीतटीची लढत होणार असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यात कर्जत-जामखेडमध्ये पालकमंत्री प्रा. राम शिंदे व राष्ट्रवादीचे उमेदवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. नेमके कोणाचे पारडे जड होणार हे कळण्यास मार्ग नाही. ती स्थिती अकोले मतदारसंघात झाली. भाजपचे वैभव पिचड व राष्ट्रवादीचे डॉ. किरण लहामटे यांच्यात चुरस निर्माण झाली. या दोन्ही मतदारसंघातील बदलते वातावरण पाहून भाजपचे प्रचाराची सांगता सभा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची घेण्याचे नियोजन केले होते. परंतु पावसामुळे शहा यांच्या दोन्ही सभा रद्द झाल्या. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांची धास्ती वाढली आहे.
पारनेरमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजय औटी व राष्ट्रवादीचे नीलेश लंके यांच्यातील लढत अटीतटीची झाली आहे. लंके यांना वाढता पाठिंबा व औटींची नाराजी यामुळे शिवसेनेला ही जागा गमवावी लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. नेवासेमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार शंकरराव गडाख व भाजपचे उमेदवार आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यात सरळ लढत आहे.

गडाख यांना माजी आमदार चंद्रशेखर घुले पुर्ण ताकदीने मदत करीत असल्याने मुरकुटेंचे आव्हान वाढले आहे. राहुरीत भाजपचे उमेदवार आमदार शिवाजी कर्डिले व राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्‍त तनपुरे यांच्यात एकतर्फी वाटणारी निवडणूक आता चुरशी झाली आहे. त्यात आ.कर्डिलेंना स्वकियांचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. त्याला लोकसभा निवडणुकीची पार्श्‍वभूमी असल्याचे बोलले जात आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात भाजपच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्या पुढे राष्ट्रवादीचे उमेदवार ऍड. प्रतापराव ढाकणे यांनी आव्हान उभे केले आहे. अर्थात माजी आ. चंद्रशेखर घुले यांनी ढाकणे यांच्यासाठी पूर्ण ताकदी उभी केली आहे. त्याबरोबर या मतदारसंघात वंजारी व मराठा या पद्धतीचे गणित मांडले जात असल्याने आ. राजळे यांच्यासाठी लढत संघर्षमय झाली आहे. अर्थात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी देखील ताकद लावली आहे.

कोपरगावमध्ये भाजपच्या विद्यमान आ. स्नेहलता कोल्हे व राष्ट्रवादीचे आशुतोष काळे अशी लढत आहे. त्यात जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे व नगराध्यक्ष विजय वहाडणे हे देखील रिंगणात असल्याने मतविभागणीचा फायदा कोणाला होणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नगर शहरात, श्रीरामपूरमध्ये देखील शिवसेनेच्या उमेदवारांपुढे आव्हान उभे ठाकले आहे. शहरात शिवसेनेचे अनिल राठोड व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप तर श्रीरामपूरमध्ये शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे व कॉंग्रेसचे लहु कानडे अशी लढत आहे. राठोड यांच्या कार्यपद्धतीवर पक्षाचे नगरसेवक व मित्रपक्ष असलेल्या भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी नाराज आहे. त्याचा फायदा जगताप यांना होण्याची शक्‍यता आहे. तिच स्थिती श्रीरामपूरमध्ये आहे. संगमनेर व श्रीरामपूरमध्ये शिवसेनेची स्वतंत्र यंत्रणा काम करीत होती.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>