Tuesday, 17 Sep, 2.01 am प्रभात

शीर्ष बातम्या
अक्कलकोटमध्ये कॉंग्रेसला अखेर खिंडार

आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचा गुरुवारी भाजप प्रवेश

सोलापूर (प्रतिनिधी) - सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठी गळती लागली असतानाच आता कॉंग्रेसलासुद्धा खिंडार पडायला सुरुवात झाली आहे. अक्कलकोट कॉंग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे येत्या गुरुवारी भाजपात प्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोमवारी आमदार म्हेत्रे यांनी अक्कलकोटमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चहा घेत केलेल्या चर्चेनंतर त्यांच्या भाजप प्रवेशाला आणखी बळकटी मिळाली आहे.

सिद्धाराम म्हेत्रे यांनी अनेक दिवसांपासून कॉंग्रेसची साथ सोडली आहे. विधानसभा इच्छुकांच्या मुलाखतीलासुद्धा म्हेत्रे यांनी दांडी मारली होती. त्याच वेळी त्यांच्या पक्षांतरच्या चर्चांना उधाण आले होते. आमदार म्हेत्रे यांना भाजपात घेण्यासाठी खुद्द पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आपली ताकद वापरली आहे.

म्हेत्रे भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात अनेक दिवसांपासून असून सोमवारी त्याला अधिकच पुष्टी मिळाल्याचे बोलले जात आहे. सोलापूर जिल्ह्यात कॉंग्रेसचे एकूण तीन आमदार आहेत. त्यापैकी आता आमदार म्हेत्रे भाजपच्या वाटेवर आहेत.

तर पंढरपूर-मंगळवेढाचे आमदार भारत भालके यांचे तळ्यात-मळ्यात असल्याने आणि त्यांनी निर्णय घेतल्यास आमदार प्रणिती शिंदे या एकमेव कॉंग्रेस आमदार राहतील, असे चित्र दिसून येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top