Monday, 10 Aug, 6.32 am प्रभात

ताज्या बातम्या
अलिबाग-मुंबई स्पीड बोट रुग्णवाहिकेला हिरवा कंदील

रायगड - रायगडकरांचे स्पीड बोट रुग्णवाहिकेच स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. राज्य सरकारने अलिबागमधील मांडवा ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडीया दरम्यान बोट रुग्णवाहिका सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. आरोग्य विभागाने नुकतेच याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत, अशी माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

अनेक वर्षांपासून रायगडकरांकडून स्पीड बोट रुग्णवाहिका सुरु करण्याची मागणी केली जात होती. मात्र आर्थिक तरतूद मोठ्या प्रमाणात करावी लागणार असल्याने प्रशासकीय पातळीवर या प्रस्तावावर निर्णय होऊ शकला नव्हता. अखेर जिल्हा वार्षिक आराखड्यातून ही योजना राबविण्याचा निर्णय जिल्हा नियोजन विभागाने घेतला होता.

या वर्षीच्या जिल्हा वार्षिक आराखड्यात नाविन्य पूर्ण योजने अंतर्गत या योजनेचा समावेश करण्यात आला होता. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा वार्षिक आराखड्यालाच कात्री लागली होती. त्यामुळे हा नाविन्य पुर्ण प्रकल्प याही वर्षी रखडण्याची चिन्ह दिसू लागली होती. मात्र आता बाह्य यंत्रणेकडून प्रायोगिक तत्वावर एका वर्षासाठी ही स्पीड बोट रुग्ण सेवा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आरोग्य विभागाने 7 ऑगस्टला याबाबातचे आदेश निर्गमित केले आहेत. यानुसार बाह्य यंत्रणाकडून निविदा मागवून ही मांडवा ते गेट वे ऑफ इंडीया दरम्यान स्पीड बोट रुग्णवाहिका कार्यान्वयित केली जाणार आहे.

या बोटीसह, रुग्णांसाठी आवश्‍यक यंत्रसामुग्री, औषधे, इंधन खर्च आणि कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक बाह्ययंत्रणेकडून केली जाणार आहे. तर बोट सेवा कार्यान्वयीत झाल्यावर बोट रुग्णवाहीकेच्या परिचलनाचा खर्च हा शासनाकडून दर महिन्याला संबधित यंत्रणेला दिला जाणार आहे. निवीदा प्रक्रीया पूर्ण झाल्यावर या रुग्णवाहिका सेवेची दर निश्‍चिती केली जाणार आहे . स्पीड बोट रुग्णवाहिकेमुळे रायगड जिल्ह्यातील रुग्णांना जलद आणि चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

रायगड जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पद रिक्त आहेत. गंभीर स्वरुपाच्या आजारांवरील उपचारासाठी आजही रायगडकरांना मुंबईतील रुग्णालयांची मदत घ्यावी लागत आहे. मात्र अलिबाग ते मुंबई हे अंतर पार करण्यासाठी साडे तीन तासाचा कालवधी लागतो. बरेचदा तातडीचे उपचार मिळू न शकल्याने रुग्णांची प्रकृती खालावते. बरेचदा रुग्ण दगावतात. ही बाब लक्षात घेऊन स्पीड बोट रुग्णवाहिका सुरु कऱण्याची मागणी रायगडकरांकडून सातत्याने केली जात होती. या स्पीड बोट सेवेमुळे रुग्णाला मांडवा येथून 15 ते 20 मिनटात मुंबईत नेणे शक्‍य होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top