Ambegaon Crime - आंबेगाव तालुक्यातील आदिवासी डोंगरी भागातील पिंपरी येथील ओढ्यात आंघोळीसाठी गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा मृतदेह बेपत्ता झाल्यानंतर आठ दिवसांनी दिगद परिसरातील घोड नदीपात्रात आढळून आला.
मृत तरुणाचे नाव दीपक सुरेश खाडे (वय 17) असे आहे. गुरुवारी (22 जुलै) सकाळी साडेनऊच्या सुमारास दीपक आणि त्याचा मोठा भाऊ विकास सुरेश खाडे (वय 24) हे शेतीपंपाची मोटार काढण्यासाठी ओढ्याकाठी गेले होते.
मोटार बाहेर काढल्यानंतर विकास स्टार्टर आणण्यासाठी पुढे गेला. त्यावेळी दीपकने आंघोळ करून येतो, असे सांगत कपडे आणि चप्पल काठावर ठेवून पाण्यात प्रवेश केला. बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने शोध घेतला असता तो बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आले. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, तरुण तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पथकाने शोधमोहीम राबविली.
मात्र मुसळधार पाऊस, ओढा आणि घोड नदीला आलेल्या पुरामुळे शोधकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले.अखेर गुरुवारी (दि. 30) दुपारी दिगद परिसरातील घोड नदीपात्रात दीपकचा मृतदेह आढळून आला. पिंपरी गावापासून सुमारे 10 ते 12 किलोमीटर अंतरावर मृतदेह सापडल्याची माहिती सरपंच लक्ष्मण मावळे यांनी दिली.
“दीपक खाडे याचा मृतदेह दिगद येथील घोड नदीपात्रात आढळून आला आहे. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.”
– सागर पवार, सहायक पोलीस निरीक्षक, घोडेगाव

