ताज्या बातम्या
अर्थसंकल्पाचे कॉंग्रेसकडून स्वागत तर भाजपची टीका

पुणे - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत शहरात संमिश्र प्रतिसाद उमटले. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून स्वागत करण्यात आले आहे तर भाजपकडून या अर्थसंकल्पावर टिका करण्यात आली असून पुण्यासाठी तसेच सर्वसामान्यांसाठी हा अंदाजपत्रक निराशाजनक असल्याची टिका भाजपच्या शहर पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या दुसऱ्या अर्थसंकल्पात पुण्यासाठी क्रीडा विद्यापीठ आणि रिंग रोड यासाठी अर्थसंकल्पात केलेली तरतूद स्वागतार्ह आहे. सध्याच्या करोनासाथीच्या काळात आरोग्य खात्यासाठी भरीव तरतूद आणि नवीन सात वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना या महत्वाच्या बाबी आहेत, गेल्या काही वर्षांत पुणे शहर हे क्रीडा नगरी म्हणून आकार घेऊ लागलेले आहे.
कॉंग्रेस पक्षाने बालेवाडी येथे भव्य क्रीडा संकुल उभारुन क्रीडा नगरीच्या वाटचालीला हातभार लावलेला आहे. पुणे रिंगरोड आणि पुणे नाशिक रेल्वे मार्ग याला मंजुरी देऊन शहर परिसराच्या विकासाला चालना दिलेली आहे असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.
या अंदाजपत्रकात पुणेकरांच्या तोंडाला पाने पुसल्याची टिका भाजप शहराध्याक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, व्यावसायिक, बेरोजगार अशा सर्वच समाज घटकांची घोर निराशा करणारा महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्प असल्याचेही मुळक यांनी म्हटले आहे.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा