Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Arvind Walse Patil : भाजप पुणे जिल्हा उत्तर उपाध्यक्षपदी अरविंद वळसे पाटील; जुन्नरच्या प्रभारीपदाचीही मोठी जबाबदारी

Arvind Walse Patil : भाजप पुणे जिल्हा उत्तर उपाध्यक्षपदी अरविंद वळसे पाटील; जुन्नरच्या प्रभारीपदाचीही मोठी जबाबदारी

प्रभात 2 weeks ago

Arvind Walse Patil - मुंबई येथे शनिवारी (ता. ३०) झालेल्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अरविंद वळसे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर जुन्नर तालुक्याचे प्रभारी म्हणूनही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती प्रदीप कंद यांनी दिली.

सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि आरोग्य क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या वळसे पाटील यांचा आंबेगाव, खेड, जुन्नर तसेच शिरूर तालुक्यातील ३९ गावांमध्ये दांडगा जनसंपर्क आहे.

सामान्य कार्यकर्ते, शेतकरी, वाहतूक व्यावसायिक आणि विविध घटकांशी त्यांची मजबूत नाळ जोडलेली आहे. महसूल व पोलीस प्रशासनाशी असलेल्या समन्वयातून त्यांनी अनेक नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी सणाच्या काळात गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना फराळाचे वाटप, लग्न समारंभामध्ये तांदूळ वापरण्याऐवजी फुलांच्या पाकळ्या, व्यसनमुक्ती आदी उपक्रमही त्यांनी सातत्याने राबविले आहेत.

त्यामुळे त्यांची प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये लोकाभिमुख कार्यकर्ता म्हणून निर्माण झाली आहे. त्यांच्या निवडीचे आंबेगाव, खेड आणि जुन्नर तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. पक्ष संघटना विस्तार, युवकांचे संघटन आणि स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांचे योगदान आगामी काळात महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नवनियुक्त भाजप पुणे जिल्हा उत्तर उपाध्यक्ष अरविंद रामसिंग वळसे पाटील यांच्या सन्मान करण्यात आला.

विश्वास सार्थ ठरविणार
नवनियुक्त उपाध्यक्ष अरविंद वळसे पाटील म्हणाले, “भारतीय जनता पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने कार्य करणार आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे. युवक-युवतींमध्ये अपघात प्रतिबंधक जनजागृती, पक्षाची सभासद नोंदणी वाढविणे आणि युवकांना राजकीय व सामाजिक कार्यासाठी प्रेरित करणे यावर विशेष भर देणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat