Monday, 13 Jul, 9.24 am प्रभात

ताज्या बातम्या
अटल स्मृती उद्यानाचे काम लवकरच सुरू

सातारा (प्रतिनिधी) - गेली तीन वर्षे शासकीय स्तरावर व मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा केल्याने सातारा शहरात युनियन क्‍लबच्या परिसरात अटल स्मृती उद्यानास मंजुरी मिळाली आहे. या उद्यानासाठी पालिकेकडून आवश्‍यक असलेली दहा टक्‍के तरतूद करण्याच्या सूचना खा. उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. या उद्यानाचा आराखडाही तयार झाला असून पहिल्या टप्प्यातील कामास लवकरच सुरुवात होणार आहे, अशी माहिती नगरसेविका व पालिकेतील भाजपच्या गटनेत्या सिद्धी पवार यांनी दिली.

त्या म्हणाल्या, साताऱ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून नावीन्यपूर्ण अटल स्मृती उद्यान उभारण्यात येणार आहे. या उद्यानात इतर सुविधांबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची थोरवी सांगणारे ऐतिहासिक प्रसंग 'साऊंड अँड लाइट इफेक्‍ट'च्या साह्याने साकारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कवी मनाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या काव्य स्मृती जतन करण्यासाठी काव्य कट्टा उभारला जाणार आहे.

कला, काव्य, आरोग्य, इतिहास व संस्कृती यांचा संगम असलेले आगळेवेगळे व एकमेव उद्यान शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी युनियन क्‍लब परिसरात होणार आहे. ही जागा गेली शंभर वर्षे पडीक होती. त्याचबरोबर त्या ठिकाणी दारू, जुगाराचा अड्डा झाला होता. ही जागा लाटण्याचे प्रयत्न अनेक जण करत होते. या प्रयत्नांना खोडा घालण्यासाठी मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांपासून आताच्या पालकमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला. या जागेसाठी आगामी काळात विशेष अनुदानही मिळवणार आहे. या ठिकाणी उद्यानाचे स्वप्न मी पाहिले होते. ते स्वप्न साकारले जाणार असल्याचा मनस्वी आनंद आहे. यासाठी अनेक लोकांनी स्फूर्ती दिली. या प्रकल्पासाठी सातारचे नेते व अनेक नागरिकांचेही सहकार्य लाभत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top