Dailyhunt
Bailgada Sharyat : बैलगाडा प्रेमींनो लक्ष द्या! कर्जतमध्ये आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार; पाहा बक्षिसांची लयलूट

Bailgada Sharyat : बैलगाडा प्रेमींनो लक्ष द्या! कर्जतमध्ये आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार; पाहा बक्षिसांची लयलूट

Bailgada Sharyat - कर्जत तालुक्यात बैलगाडा शर्यतींची वाढती आवड लक्षात घेता आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि. ८) कळंब येथील बोरीचीवाडी येथे ही रंगतदार स्पर्धा पार पडणार असून प्रथम क्रमांकासाठी चारचाकी गाडीचे आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले आहे.

पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

विस्तीर्ण मैदानामुळे एकाच वेळी तब्बल नऊ बैलगाड्या धावणार असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे ८०० हून अधिक नामांकित बैलगाडा मालक सहभागी होणार आहेत. स्पर्धा मैदान परिसरात पाणी बाटल्या, लस्सी, ताक, वालाच्या शेंगा, भुईमूग, कलिंगड, वडापाव, आईस्क्रीम, बर्फगोळा आदी विविध खाद्यपदार्थांची दुकाने मोठ्या प्रमाणावर उभारली जाणार आहेत. स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी चारचाकी गाडी आणि ढाल, तृतीय क्रमांकासाठी बुलेट आणि ढाल, तर पुढील सहा क्रमांकांसाठी दुचाकी आणि आकर्षक ढाल देण्यात येणार आहेत.

त्यामुळे या स्पर्धेकडे राज्यभरातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागले आहे. या थरारक स्पर्धा पाहण्यासाठी सुमारे २५ हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. थोरवे फाउंडेशनच्या वतीने आमदार महेंद्र थोरवे यांचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात असून, यंदाही या बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून उत्सवाला विशेष रंगत येणार आहे.

नामांकित बैलांचा सहभाग
या स्पर्धेत बकासुर, मथूर, सिकंदर, सर्जा, राजा, देवा, झुल्या, गोविंदा, भुंगा डॉन, बाबा डॉन, रामा, लखन, शाहीर, बगिरा, साज, दगडू, पुष्पा, रायबा, मल्हार, भला, प्रधान, लक्ष्या, सम्राट, चिक्या, सचिन, सत्या, मोन्या, बादल, महिब्या, नंदया, साम्राज्य, महाकाल, भवरा, पुण्या, शिवा, लाडू आदी मोठ्या नामांकित बैलांचा समावेश आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat