Saturday, 05 Oct, 12.00 pm प्रभात

शीर्ष बातम्या
बाराही लढती ठरल्या

सहा ठिकाणी दोघांत येणार का तिसरा?

नगर - जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघात प्रमुख उमेदवार कोण हे आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले.मात्र काही ठिकाणी बंडखोरी झाली तर दोघात तिसरा कोण असणार हे मात्र माघारीच्या दिवशी म्हणजेच सोमवारी दुपारी स्पष्ट होईल.आजच्या घडीला अकोले,संगमनेर, शिर्डी,नेवासा,राहुरी व कर्जत-जामखेड या सहा मतदारसंघात सरळ लढती आहेत.

तर,पारनेर,कोपरगाव,श्रीरामपूर,श्रीगोंदा,नगर शहर,शेवगाव-पाथर्डी या सहा मतदारसंघात बंडखोरी होवून दोघात तिसरा येणार की येथेही सरळ लढती होणार हे सोमवारीच स्पष्ट होईल.
दरम्यान,राष्ट्रवादी कॉंग्रेसने राहुरीतून प्राजक्त प्रसाद तनपुरे यांना तर श्रीगोंदा येथून आमदार राहुल जगताप यांनी असमर्थता दर्शविल्याने घनश्‍याम शेलार यांना उमेदवारी दिली आहे.नेवासा येथे शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे शंकरराव गडाख यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केले आहे. त्यामुळे तेथे राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही.

शिर्डीत मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात कॉंग्रेसकडून सुरेश जगन्नाथ थोरात यांना उमेदवारी दिली आहे.तर संगमनेरमध्ये शिवसेनेने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात साहेबराव नवले यांना उमेदवारी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी श्रीगोंद्यातून अपक्ष अर्ज भरला आहे. तर,कोपरगावमधून जिल्हा परिषद सदस्य व विखे यांचे मेहुणे राजेश परजणे यांनी आज अपक्ष अर्ज दाखल केला आहे.नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी यापूर्वीच अर्ज भरला आहे. त्यामुळे ते माघारीच्या दिवशी काय भूमिका घेतात हे बघणे महत्वाचे आहे.

पारनेरमध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेपाठोपाठ आज भाजपातील बंडखोरी उघड झाली. भाजपचे कार्यकारणी सदस्य व माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे यांनी अर्ज दाखल केला आहे. शेवगाव-पाथर्डीत आमदार मोनिका राजळे व राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे,अमोल गर्जे यांचे अर्ज आहेत.श्रीरामपूरमध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव चेतन लोखंडे यांचा अर्ज आहे.कर्जत-जामखडेमध्ये राम शिंदे यांची मते कोण घेणार यावर येथील लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

हे आहेत प्रमुख उमेदवार
पारनेर : विजय औटी(शिवसेना) निलेश लंके(राष्ट्रवादी कॉंग्रेस), कोपरगाव:स्नेहलता कोल्हे(भाजप) आशुतोष काळे(राष्ट्रवादी कॉंग्रेस), नगर शहर: संग्राम जगताप(राष्ट्रवादी कॉंग्रेस) अनिल राठोड(शिवसेना), संगमनेर:बाळासाहेब थोरात(,इंदिरा कॉंग्रेस) साहेबराव नवले(शिवसेना), अकोले:वैभव पिचड(भाजप) किरण लहामटे(राष्ट्रवादी कॉंग्रेस), शिर्डी:राधाकृष्ण विखे(भाजप) सुरेश थोरात(इंदिरा कॉंग्रेस), श्रीरामपूर: भाऊसाहेब कांबळे(शिवसेना) लहू कानडे(इंदिरा कॉंग्रेस), नेवासा: बाळासाहेब मुरकुटे(भाजप) शंकरराव गडाख (शेतकरी क्रांतिकारक पक्ष पुरस्कृत राष्ट्रवादी कॉंग्रेस), शेवगाव-पाथर्डी:मोनिका राजळे(भाजप) प्रताप ढाकणे(राष्ट्रवादी कॉंग्रेस), राहुरी:शिवाजी कर्डीले(भाजप) .प्राजक्त तनपुरे(राष्ट्रवादी कॉंग्रेस), श्रीगोंदा:बबनराव पाचपुते(भाजप) घनश्‍याम शेलार(राष्ट्रवादी कॉंग्रेस), कर्जत-जामखेड:राम शिंदे(भाजप) रोहित पवार(राष्ट्रवादी कॉंग्रेस)

नगर शहरात भाऊगर्दी
नगर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आमदार संग्राम जगताप व शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यात लढत होणार असली तरी बसपाकडून श्रीपाद छींदम,वंचित आघाडीकडून किरण काळे,भाकपकडून बाबासाहेब वाकळे,मनसेकडून संतोष वाकळे,एमआयएमकडून नगरसेवक असिफ सुलतान यांच्यासह एकूण 17 उमेदवारांनी 21 अर्ज दाखल केले आहेत. यातील सोमवारी किती जण माघार घेतात व बसपा, वंचित आघाडी, भाकप,एमआयएम,मनसे यांचा कुणाला फ टका बसतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top