Monday, 30 Sep, 9.14 am प्रभात

मुखपृष्ठ
बेपर्वाईच्या बळींचे यंदाही द्विशतक!

- कल्याणी फडके

पुणे - रेल्वे मार्गांवर अनधिकृत पद्धतीने ट्रॅक ओलांडताना मृत्यू होण्याचे प्रमाण जनजागृती करुनही कमी होताना दिसत नाही. नागरिक जीवाची पर्वा न करता फक्‍त वेळ वाचवण्यासाठी बेकायदा पद्धतीने ट्रॅक ओलांडतात. तर दुसरीकडे आत्महत्येसाठी रेल्वे मार्ग हा सर्वाधिक पर्याय निवडला जात असल्याचेही समोर आले आहे. रेल्वेच्या पुणे विभागात पुणे ते कोल्हापूर आणि मळवली (लोणावळा) ते पाटस (दौंड) असा मार्ग येतो. या मार्गावर यंदा जानेवारी ते ऑगस्टदरम्यान 210 जणांचा मृत्यू झाला आहे.

रेल्वे प्रशासनाकडून वारंवार समज देऊन, उद्‌घोषणा करून, कारवाई करूनही रेल्वे मार्गावर होणाऱ्या मृत्यूची संख्या 'जैसे थे'च असल्याचे दिसून येते. रेल्वे मार्गावर महिन्याला सरासरी 25 हून अधिक जणांचा मृत्यू होत आहे. यामध्ये अनधिकृतपणे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांसह आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पुणे विभागात मागील वर्षी जानेवारी ते ऑगस्ट 2018 या कालावधीत 235 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर यंदा याच कालावधीत 210 जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत काही अंशी घटली असली, तरी नागरिकांचे मात्र दुर्लक्षच आहे. रेल्वे मार्गावर होणाऱ्या मृत्यूंमध्ये प्रामुख्याने आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे, अशी माहिती आरपीएफ अधिकाऱ्यांनी दिली. अनधिकृतपणे रेल्वे मार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांना 'आरपीएफ'कडून अटकाव करत दंडात्मक कारवाईदेखील केली जाते. तर भारतीय रेल्वे अधिनियम कलम 147 अंतर्गत अनाधिकृत मार्गाने रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्यांना हजार रुपये दंड किंवा सहा महिने तुरुंगवास किंवा या दोन्ही शिक्षा सुनावल्या जाऊ शकतात.

मागील काही महिन्यांमध्ये या कायद्यांतर्गत 15 जणांना कारावासाची शिक्षा झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे. रेल्वे स्थानक परिसरांतील उड्डाणपुलांचा वापर करणाऱ्यांपेक्षा, थेट रेल्वे मार्ग ओलांडणाऱ्यांची प्रवाशांची संख्या जास्त आहे. या बेकायदेशीर प्रकारामुळे अनेकांनी जीव गमावला आहे. तर अनेकांना अपंगत्व आल्याच्याही घटना घडल्या आहेत.

मृत्यूची प्रमुख कारणे
धावत्या गाडीतून
चढणे, उतरणे
रेल्वेच्या दरवाजात
बसून प्रवास करणे
रेल्वे रूळ ओलांडताना गाडीची माहिती नसणे
धावत्या गाडीमध्ये 'स्टंटबाजी' करणे
प्रशासनाच्या सूचनांकडे
दुर्लक्ष करणे
रेल्वे स्थानक परिसरात आत्महत्या करणे

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top