Saturday, 28 Nov, 5.24 am प्रभात

ताज्या बातम्या
बेशिस्त रिक्षा चालकांच्या तक्रारींसाठी हेल्पलाइन नंबर

  • दैनिक प्रभातच्या वृत्तमालिकेची वाहतूक पोलिसांकडून दखल
  • 9529681078 या क्रमांकावर फोन, व्हॉटस्‌ऍपद्वारे करु शकता तक्रार

पिंपरी - शहरातील रिक्षा चालकांचा बेशिस्तपणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यावर प्रकाशझोत टाकणारी वृत्तमालिका गेली चार दिवस दै. 'प्रभात'मध्ये प्रसिद्ध झाली. याची दखल घेत वाहतूक विभागाचे सहायक आयुक्‍त श्रीकांत दिसले यांनी बेशिस्त रिक्षा चालकांच्या तक्रारींसाठी 9529681078 हा क्रमांक जाहीर केला. या क्रमांकावर नागरिक फोन आणि व्हॉटस्‌ऍपद्वारे तक्रार करू शकणार आहेत.

सुविधा नव्हे शिक्षा या शीर्षकाखाली मंगळवारी (दि. 24) 'भंगारातील तीन हजार रिक्षा रस्त्यावर' हा पहिला भाग प्रसिद्ध झाला. त्यानंतर 'मीटरप्रमाणे भाडे आकारणी कधी होणार' हा दुसरा भाग बुधवारी (दि. 25) प्रसिद्ध झाला. 'गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षा चालकांवर कारवाईची गरज' हा तिसरा भाग गुरुवारी (दि. 26) प्रसिद्ध झाला. तर 'क्षमतेच्या तिप्पट प्रवासी वाहतूक' हा चौथा भाग शुक्रवारी (दि. 27) रोजी प्रसिद्ध झाला. या चारही भागांची दखल वाहतूक विभागाचे सहायक आयुक्‍त श्रीकांत डिसले यांनी घेतली.

याबाबत बोलताना डिसले म्हणाले, ''रिक्षा चालकांबाबत अनेक तक्रारी वाहतूक विभागाकडे येत असतात. मात्र प्रत्येकालाच वाहतूक चौकी किंवा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन तक्रार देणे शक्‍य होत नाही. याचाच गैरफायदा बेशिस्त रिक्षा चालक घेतात.'

भंगारातील रिक्षा होणार जप्त
भंगारातील रिक्षांबाबत लवकरच वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरु करण्यात येणा आहे. डिसले यांनी सांगितले की, भंगारातील रिक्षांवर कारवाई करण्यासाठी ज्या रिक्षांची मुदत संपुष्टात आली आहे त्या सीरीजची माहिती आरटीओकडून घेण्यात आली आहे. भंगारातील या रिक्षा ताब्यात घेऊन त्या नष्ट करण्यासाठी संयुक्‍तरित्या मोहीम राबविण्यात येणार आहे. ताब्यात घेतलेल्या रिक्षांची विल्हेवाटही लावण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून तयारी झालेली आहे. लवकरच या मोहिमेला सुरवात होईल.

मीटरप्रमाणे भाडे न घेतल्यास कारवाई
मीटरप्रमाणे भाडे आकारणीबाबत बोलताना डिसले म्हणाले, नियमानुसार रिक्षा चालकाने मीटरप्रमाणेच भाडे घेणे अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. यासाठी दहा जणांचे एक पथक तयार करण्यात येणार आहे. शहराच्या विविध भागात साध्या वेषात हे पथक फिरणार आहे. जे रिक्षा चालक मीटरप्रमाणे भाडे आकारणी करणार नाही, त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन असलेल्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला आहे. नागरिकांची अशा रिक्षा चालकाच्या रिक्षाचा फोटो आणि त्याने कोणते चुकीचे वर्तन केले आहे याची माहिती व्हॉटस्‌ऍपवर दिल्यास संबंधितावर कारवाई करणे सोयीचे होणार आहे.

पाच हजार बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई
गेल्या महिन्यात वाहतूक पोलिसांनी बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 23 ऑक्‍टोबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत वाहतूक पोलिसांनी पाच हजार 104 रिक्षांवर कारवाई केली आहे. तसेच या रिक्षा चालकांना 16 लाख 70 हजारांचा दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती वाहतूक विभागाचे सहायक आयुक्‍त श्रीकांत डिसले यांनी दै. 'प्रभात'शी बोलताना दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top