Dailyhunt
Bhalgudi Lavhalwadi Fire : मुळशीत आगीचा तांडव! लव्हाळवाडीत एकापाठोपाठ ८ घरे खाक; नेमकं काय घडलं?

Bhalgudi Lavhalwadi Fire : मुळशीत आगीचा तांडव! लव्हाळवाडीत एकापाठोपाठ ८ घरे खाक; नेमकं काय घडलं?

Bhalgudi Lavhalwadi Fire - मुळशी तालुक्यातील भालगुडी येथील लव्हाळवाडी परिसरात भीषण आग लागून सुमारे आठ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याची घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग लागल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर युद्धपातळीवर प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात आली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी अनेक कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य, घरातील वस्तू आणि मालमत्ता जळून खाक झाली आहे. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे प्रभावित कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

घटनास्थळी मुळशी आपत्ती व्यवस्थापन टीम, तहसीलदार विजयकुमार चोबे, सभापती मंदाताई शेळके, पंचायत समिती सदस्य प्रवीण धनवे, तलाठी, कोतवाल तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल भामे आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून, बाधित कुटुंबांना मदत देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने मदत व पुनर्वसनाची मागणी केली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षित वीज व्यवस्थेची गरज व्यक्त केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat