Monday, 17 Feb, 11.15 am प्रभात

मुखपृष्ठ
भामा आसखेड प्रकल्पाच्या कार्यवाहीला सुरुवात

शहरासाठी उचलले जाणार 167 दशलक्ष लिटर पाणी

पिंपरी - महापालिकेच्या वतीने आंद्रा धरणापाठोपाठ आता भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी आवश्‍यक प्राथमिक कामाला सुरवात झाली आहे. या प्रकल्पासाठी आवश्‍यक जलवाहिन्या टाकण्यासाठी 162 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. पुढील अडीच वर्षांमध्ये हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. भामा आसखेड धरणातून शहरासाठी 167 दशलक्ष लिटर इतके पाणी उचलण्यात येणार आहे.

भामा आसखेड धरणापासून नवलाख उंब्रे आणि तेथून देहू बंधारा अशा एकूण 26 किलोमीटरच्या अंतरात जलवाहिन्या टाकण्यात येणार आहे. त्याशिवाय, हेडवर्क्‍सच्या कामासाठी देखील निविदा प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे. महापालिकेने यापूर्वी आंद्रा धरणातून पाणी उचलण्यासाठी चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्राचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी यापूर्वी 46 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली. त्या पाठोपाठ जलवाहिनीसाठी 47 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. आंद्रा धरणातून 100 दशलक्ष लिटर इतके पाणी उचलण्याचे नियोजन आहे.

शहराची लोकसंख्या वेगाने वाढते आहे. आजमितीला 25 लाखांपेक्षा आधिक लोकसंख्या झाली आहे. शहरात सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. दिवसाआड 480 दशलक्ष लिटर इतके पाणी शहराला पुरविले जात आहे. पुढील पाच वर्षांच्या लोकसंख्या वाढीचा विचार करता सध्या देण्यात येणारे पाणी अपुरे पडणार आहे. महापालिकेत 1997 मध्ये 17 गावे समाविष्ट झाली. या गावांमध्ये नागरीकरणाचा वेग प्रचंड आहे. नव्या गृहप्रकल्पांना आवश्‍यक पाणी पुरविण्यासाठी पुरेशी तजबीज महापालिकेकडे उपलब्ध नाही. सुमारे साडेतीन हजारापेक्षा अधिक गृहनिर्माण सोसायट्यांना पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यातही विशेषत: वाकड आणि पिंपळे सौदागर भागातील पाणी प्रश्‍न गंभीर आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top