Thursday, 01 Oct, 11.15 pm प्रभात

पुणे
भटक्‍या कुत्र्यांची पुणेकरांमध्ये धास्ती

  • एप्रिल ते ऑगस्टदरम्यानची आकडेवारी
  • दुचाकीस्वारांचा भरदिवसा पाठलाग

पुणे - शहरात गेल्या काही महिन्यांपासून भटक्‍या कुत्र्यांवर करण्यात येणारी नसबंदी प्रक्रिया काहीशी मंदावल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. एप्रिल ते ऑगस्ट 2020 या लॉकडाऊन काळात अवघ्या 3,689 भटक्‍या कुत्र्यांवर नसबंदी करण्यात आली.

गेल्या तीन वर्षांपासून सरासरी नसबंदीचा आकडा प्रतिवर्ष सुमारे 12 हजार एवढा आहे. याचाच अर्थ 6 महिन्यांत सरासरी 6 हजार कुत्र्यांवर नसबंदी होते.

शहरात गल्लोगल्ली भटकी कुत्री टोळक्‍याने मुक्‍त संचार करताना दिसतात. यापूर्वी केवळ रात्रीच दुचाकीवर धावून जाणारी कुत्री आता भरदिवसाही दुचाकीस्वारांच्या मागे लागत त्यांच्यावर हल्ला करत असल्याच्या काही घटना गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत. त्यामुळे पुणेकर सध्या कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरत आहेत.

दरम्यान, 2018-19 मध्ये 12 हजार 241 कुत्र्यांवर नसबंदी झाली. हा आकडा वाढला असून तब्बल 19 हजार 630 कुत्र्यांवर 2019-20 मध्ये नसबंदी झाली. त्या तुलनेत एप्रिल ते ऑगस्ट 2020 या पाच महिन्यांत नसबंदीचे प्रमाण मात्र घटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top