Monday, 02 Mar, 6.37 pm प्रभात

मुखपृष्ठ
भीमा नदी काठचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरले

18 हजार हेक्‍टर क्षेत्र येणार ओलिताखाली ः बळीराजा सुखावला
1 हजार 51 क्‍युसेक वेगाने सोडले पाणी ः पिकांना होणार फायदा

शिक्रापूर (वार्ताहर) - भामा आसखेड धरणातून रब्बीच्या दुसऱ्या आवर्तनाचे 1 हजार 59 क्‍युसेक वेगाने पाणी सोडल्याने शिरूर, हवेली व दौंड तालुक्‍यातील भीमा नदीवरील असलेले वढू बुद्रुकपासून आलेगाव पागापर्यंतचे आठ बंधारे पूर्ण क्षमतेने भरले असल्याची माहिती कोंढापुरी पाटबंधारे शाखेचे शाखा अभियंता परिमल सोनवणे यांनी दिली आहे.
भामा आसखेड धरणामधून 15 जानेवारी दरम्यान पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. तर चालू वर्षातील उन्हाळ्यामधील भामा आसखेड धरणाचे रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन (दि. 22 फेब्रुवारी) सोडल्याने शेतकरीवर्ग आनंदी आहे.

शिरूर, हवेली व दौंड या तीन तालुक्‍यातील भीमा नदीवर असणाऱ्या 8 बंधाऱ्यातील पाण्यावर या वर्षीच्या तिन्ही हंगामात 18 हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येत असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. या पाण्यामुळे या बागायती पट्ट्यातील शेतकरी वर्ग ऐन उन्हाळ्यात पाणी मिळाल्याने समाधानी झाला आहे. सध्या शिरूर, हवेली व दौंड या तीन तालुक्‍यातील वढू बुद्रुक 161, पेरणे 92, बुर्केगाव 73, सांगवी सांडस व विठ्ठलवाडी 92, पाटेठाण 86, शिवतक्रार म्हाळुंगी 145, वडगाव बांडे 44 दशलक्ष फूट क्षमतेने हे सात बंधारे भरले आहेत. आलेगाव पागा येथील बंधारा 158 दशलक्ष फूट क्षमतेचा पूर्ण क्षमतेने भरला जाणार आहे. यामुळे शिरूर, हवेली व दौंड या तीन तालुक्‍यातील बागायती पट्ट्यातील शेतकरी वर्ग आनंदी आहे.

भामा आसखेडमध्ये 85 टक्‍के साठा
भामा आसखेड धरणामधून रब्बीचे हे दुसरे आवर्तन सोडण्यात आलेले असून हे पाणी साधारण सव्वा महिना म्हणजे 15 एप्रिलपर्यंत पुरणार आहे. तसेच सध्या भामा आसखेड धरणामध्ये पाण्याचा साठा 85 टक्‍के उपलब्ध असल्याचे अभियंता सोनवणे यांनी सांगितले. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top