Bhiwandi :ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील नारपोली परिसरात गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंटच्या तळ अधिक चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून, एनडीआरएफ आणि टीडीआरएफच्या पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
ढिगाऱ्याखाली अजूनही काही नागरिक अडकल्याची शक्यता असून, पोखलँड मशीनच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू आहे.
इमारतीचा पिलर धोकादायक झाल्याने दुरुस्तीचे काम सुरू असतानाच रात्री इमारतीचा एक भाग कोसळला. रात्री आठच्या सुमारास इमारत एका बाजूने झुकत असल्याचे लक्षात आल्यानंतर बहुतांश रहिवाशांना बाहेर काढण्यात आले होते. मात्र, काही नागरिक आणि कामगार इमारतीतच असल्याने ते ढिगाऱ्याखाली अडकले. (Bhiwandi building collapse)
घटनास्थळी महापालिकेचे आपत्कालीन पथक, अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि टीडीआरएफची पथके तातडीने दाखल झाली. बचाव पथकांनी आतापर्यंत ९ मृतदेह बाहेर काढले असून, त्यापैकी ५ जणांची ओळख पटली आहे. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध सुरू असून बचावकार्य अद्याप सुरू आहे.

