Saturday, 21 Sep, 9.46 am प्रभात

मुखपृष्ठ
भोरमध्ये दिसणार 'आघाडी'ची ताकद

कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने एकदिलाने काम करण्याची गरज

- दत्तात्रय बांदल

भाटघर - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी झाल्यानंतर कॉंग्रेसचा बालेकिल्ला असेलेल्या भोरमध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. भाजप आणि शिवसेनेकडून हा मतदार संघ ताब्यात घेण्याबाबत वल्गना केल्या जात असतानाच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाल्याने भोर विधानसभेत या पक्षांची ताकद दिसून येणार असल्याचा विश्‍वास व्यक्‍त केला जात आहे.

भोर मतदार संघातील लढती चुरशीच्या होतील, असा अंदाज लावला जात होता. भाजप तसेच शिवसेनेकडून या मतदार संघात प्रयत्न सुरू झाले असताना आघाडीबाबतचा निर्णय झाल्याने आघाडी धर्मानुसान कॉंग्रेसच्या ताब्यात असलेल्या या मतदार संघात कॉंग्रेसला राष्ट्रवादीचे बळ मिळाले असल्याचे मानले जात आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. यातही भोर मतदार संघात कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादीकडूनही उमेदवार रिंगणात उतरतील असा अंदाज ठेवत भाजप तसेच शिवसेनेकडूनही उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. याशिवाय राष्ट्रीय समाज पक्षानेही आपला उमेदवार या मतदार संघात उभा करण्याचा इरादा स्पष्ट केला होता. शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांची संख्या सर्वाधिक होती. अशा स्थिथीत कॉंग्रेसकडून विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांनाच उमेदवारी दिली जाणार असे मानले जात होते. यानुसार कॉंग्रेसकडून जाहीर होत असलेल्या यादीत भोरमधून संग्राम थोपटे यांचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्‍चितच झाल्याने या मतदारसंघात दोन्ही पक्षाची ताकद एकवटणार आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांना भोरमधून मोठी मदत मिळाल्याने कॉंग्रेसच्या या मतदारसंघात विधानसभेला संग्राम थोपटे यांना मदत करण्याचा निर्णय आघाडी धर्मानुसार घेतला होता. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळाल्यानंतर विधानसभेकरिता इच्छुक, प्रबळ दावेदार असलेले कॉंग्रेसचे उमेदवार थोपटे यांना निवडणूक सोपी जाणार असल्याचीही चर्चा होती. परंतु, कॉंग्रेसच्या ताब्यात असलेला भोर मतदारसंघ जिंकण्यासाठी शिवसेनसह, रासपनेही कंबर कसली आहे. भोर तालुक्‍यातून 2014 मध्ये संग्राम थोपटे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून निवडणूक मैदानात उमेदवार उतरविण्यात आला होता. त्यावेळी भाजपची मोदी लाट होती. त्यामध्ये राज्यात कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादीची पडझड होत असताना भोर मतदारसंघ कॉंग्रेसच्या ताब्यात ठेवण्यात आमदार थोपटे यांना यश आले होते. आता, यावेळी आघाडी झाली असल्याने बालेकिल्ल्यात कॉंग्रेसची ताकद आणखी वाढणार असल्याचे तसेच भोरमध्ये भाजप, शिवसेना तसेच अन्य पक्षांना निवडणूक सोपी नसल्याचे राजकीय विश्‍लेषक सांगत आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत या मतदारसंघात नेहमीच श्रेयवाद असताना आता आघाडी झाल्याने भोरसाठी या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकदिलाने काम करणे गरजेचे ठरणार आहे. विधानसभेसाठी आघाडीचे स्वरूप नेमके काय असणार, याबाबतची उत्सुकता संपली असली तरी भोरसाठी विद्यमान आमदार थोपटे यांना स्वत:ची ताकद दाखवावीच लागणार आहे.

विरोधकांना गाफील ठेवण्यासाठी…
विधानसभेला आघाडी धर्म नक्की पाळू, असे आश्‍वासन देत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अर्ज मागविण्यात आले होते. या पक्षाकडून विधानसभेसाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आल्यानंतर कॉंग्रेसकडूनही राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघातून अर्ज मागविण्यात आले होते. आघाडीचा निर्णय जवळपास झालेला असताना अर्ज मागविले जात असल्याने दोन्ही पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमात होते. परंतु, आता आघाडीचा निर्णय झाल्यानंतर केवळ विरोधकांना गाफील ठेवण्यासाठी अर्ज मागविले जात होते, अशी चर्चा कार्यकर्त्यात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top