Bhuvneshwar Kumar 200 IPL Wickets Record : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आयपीएलमध्ये आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळताना भुवीने २०० विकेट्सचा टप्पा गाठला.
आयपीएलच्या इतिहासात हा टप्पा गाठणारा तो पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी केवळ फिरकीपटूंनीच २०० पेक्षा जास्त विकेट्स घेतले होते, मात्र वेगवान गोलंदाजांच्या यादीत भुवी आता ‘किंग’ बनला आहे.
आयुष म्हात्रे ठरला २०० वा शिकार –
चेन्नईच्या डावातील सुरुवातीच्या षटकांत भुवीने आयुष म्हात्रेला बाद करून हा मोठा पराक्रम केला. त्याने टाकलेल्या ‘हार्ड लेन्थ’ चेंडूवर म्हात्रेने पूल शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू नीट बॅटवर न आल्याने मिड-ऑफला उभे असलेल्या रजत पाटीदारने सोपा झेल टिपला. म्हात्रे केवळ १ धाव काढून बाद झाला आणि भुवीच्या नावे ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली.
आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज –
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भुवी आता दुसऱ्या स्थानी आहे. पहिल्या क्रमांकावर युझवेंद्र चहल (२२४ विकेट्स) असून भुवी २०० विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज:
युझवेंद्र चहल: २२४ विकेट्स भुवनेश्वर कुमार: २०० विकेट्स सुनील नरेन: १९३ विकेट्स पीयूष चावला: १९२ विकेट्सआरसीबीने उभारला धावांचा डोंगर –
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने चेन्नईच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. आरसीबीने २० षटकांत २५० धावांचा विशाल डोंगर उभा केला. यामध्ये देवदत्त पडिक्कल (५० धावा) आणि टीम डेव्हिडच्या (२५ चेंडूत ७०* धावा) तुफानी फटकेबाजीचा मोठा वाटा राहिला. टीम डेव्हिडने ८ उत्तुंग षटकार ठोकले, तर कर्णधार रजत पाटीदारने १९ चेंडूत नाबाद ४८ धावा कुटल्या.

