Census Duty Negligence - महापालिकेकडून शहरात जणगननेचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, या कामासाठी नेमणूक करण्यात आलेले काही कर्मचारी अद्यापही कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी अशा कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
त्याअंतर्गत सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून दोन कर्मचाऱ्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठीची तक्रार दिल्याची माहिती सहाय्यक महापालिका आयुक्त विजयकुमार वाघमोडे यांनी दिली.
सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत जनगणनेच्या कामासाठी एकूण १ हजार १७४ ब्लॉक तयार केले आहेत. त्यासाठी प्रशासनाने १ हजार १७४ प्रगणक आणि १९२ पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. मात्र, तब्बल ९० कर्मचारी अनुपस्थित राहिल्याचे समोर आले आहे. प्रशासनाकडून संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना कामावर रुजू होण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
मात्र, यापैकी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, तसेच ३८ कर्मचारी पुढील दोन दिवसांत रुजू होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जनगणनेसाठी शासकीय आस्थापना, जलसंपदा व पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, तसेच इतर शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना रीतसर नियुक्ती आदेश देण्यात आले होते.
मात्र, स्पष्ट आदेश असूनही विविध विभागांतील अनेक कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर हजर न राहता या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यानंतर आता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली असल्याचे महापालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

