Wednesday, 15 Sep, 7.48 pm प्रभात

ताज्या बातम्या
चऱ्होली खुर्द येथे पोषण अभियानांतर्गत जनजागृती

आळंदी - आपण जे खातो, तो आहार संतुलित असला पाहिजे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कमी खा; पण संतुलित खा असाच संदेश आळंदी शहरातील स्री रोग तज्ञ डॉ. मोनिका भेगडे यांनी दिला. दि. 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत देशभर 'राष्ट्रीय पोषण महिना' साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोठी मोहीम राबविण्यात येत असून पोषणाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यात येत आहे.

याच मोहिमेचा भाग म्हणून एकात्मिक बाल विकास सेवा योजना, राष्ट्रीय पोषण जनजागृती मोहीम अंतर्गत सकस आणि पोषण आहाराचे महत्त्व पटवून सांगण्यासाठी चऱ्होली खुर्द, ठाकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आळंदी शहरातील स्री रोग तज्ञ डॉ. मोनिका भेगडे आणि डॉ. अपर्णा स्वामी यांचे स्री आरोग्य विषयक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

डॉ. भेगडे म्हणाल्या, अन्न ही मानवी जीवनाचे अस्तित्व टिकविण्यास आवश्‍यक अशी प्राथमिक गरज आहे. शरीराची वाढ होणे, झीज भरुन काढणे, ऊर्जा निर्मिती, कार्यशक्ती या बाबी शरिराने उपयोग केलेल्या अन्नामुळे घडून येतात. त्यामुळे आहारात घेतलेले अन्न पोषणदृष्ट्‌या समतोल हवे. शरीरपोषण व संवर्धन यासाठी प्रथिने, पाणी, जीवनसत्व व खनिज द्रव्ये ह्यांचा आवश्‍यक तेवढा पुरवठा व त्याचे योग्य प्रमाण आपल्या आहारात पाहिजे. कोणत्याही एकाच खाद्यपदार्थात हे सर्व घटक योग्य प्रमाणात मिळणे शक्‍य नसल्याने या सर्व घटकांचे सुयोग्य प्रमाण रोजच्या आहारात विविध पदार्थ समाविष्ट करुन साधले पाहिजे. अशा संमिश्र आहाराला समतोल आहार किंवा संतुलित आहार म्हणतात.

या वेळी पर्यवेक्षिका अनिता लांडे, चऱ्होली खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच काळूराम थोरवे, रवींद्र थोरवे, ग्रामपंचायत सदस्य रामदास घोलप, पांडुरंग थोरवे, अनिकेत कुऱ्हाडे, प्रताप थोरवे, राजकुमार बांगर, गणेश थोरवे, इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे, जगत क्‍लिनिकचे शैलेश सावतडकर, पत्रकार ज्ञानेश्वर फड, एम. डी. पाखरे, दिनेश कुऱ्हाडे, श्रीकांत बोरावके अंगणवाडी सेविका सारिका थोरवे, आशा सावंत, उज्वला थोरवे, कल्पना थोरवे, मंदाकिनी कुंभार, राजश्री गायकवाड, अंगणवाडी मदतनीस सुलोचना जाधव, सीमा पवार, लतिका पगडे, सीमा केवळ उपस्थित होते. या कार्यक्रमाअंतर्गत सर्व पोषण आहार जनजागृतीसाठी महिला आणि मुलींची रॅली काढण्यात आली. यावेळी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

'खरं तर पोषण चळवळीचा मुख्य पाया आहे. आपण बऱ्याचवेळा पाहतो लोक संतुलित आहार घेत नाहीत. बहुतांशी महिलांना घरात मिळणाऱ्या दुय्यम स्थानामुळे शेवटी जेवणे, अन्न शिळे खाणे असे प्रकार होतात. परिणामत: कुपोषण वाढत असते. फास्ट फूडचे जास्त सेवन केल्याने भविष्यात लठ्ठपणा, हायपरटेंशन, असे आजार होण्याची जास्त शक्‍यता असते. कुपोषणामुळे बुटकेपणा, बारिक शरीरयष्टी असणारी मुलं पाहतो जी वारंवार आजारी पडतात. अशा मुलांचा शारीरिक विकास नीट न झाल्याने बौद्धिक विकासही नीट होत नाही.'
-डॉ. अपर्णा स्वामी, आळंदी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top