Chetak Screen Awards 2026 : अलीकडेच इंडस्ट्रीतील लोकप्रिय आणि मानाचा असलेला चेतक स्क्रीन अवॉर्ड्स सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार धर्मेंद्र यांचे पुत्र अभिनेता बॉबी देओल याने स्वीकारला. मात्र यावेळी बॉबी देओल भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या या सोहळ्यादरम्यानचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जावेद अख्तर, रमेश सिप्पी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार बॉबी देओल याने स्वीकारला. यावेळी त्याने, आज अशा पद्धतीने पुरस्कार स्वीकारायची वेळ येईल, असं वाटलंही नव्हतं, असं म्हणत भावनांना वाट मोकळी करुन दिली.
बॉबी देओल झाला भावूक Chetak Screen Awards 2026
पुरस्कार स्वीकारताना बॉबी देओलला आपले अश्रू अनावर झाले. तो म्हणाला, "मी तुम्हा सर्वांच्या डोळ्यांत माझ्या वडिलांविषयीचे प्रेम पाहत आहे. माझ्या वडिलांनी त्यांच्या कामातून आणि अगदी त्यांच्या इन्स्टाग्राम रील्समधूनही जे त्यांचे नवीन छंद बनले होते, ते सर्वांच्या हृदयाला स्पर्श केला.
लोकांनी नेहमी आनंदी राहावे अशी त्यांची इच्छा होती. देवाने आपल्या सर्वांना आयुष्यात खूप काही दिले आहे, असे ते मानायचे. ते म्हणायचे की आपल्या प्रत्येकामध्ये एक खास गोष्ट असते आणि जर आपण त्यावर विश्वास ठेवला तर आपण काहीही साध्य करू शकतो."
आपल्या वडिलांच्या जिद्दीबद्दल आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या प्रदीर्घ प्रवासाबद्दल बोलताना बॉबी म्हणाला, "त्यांनी या इंडस्ट्रीत इतकी वर्षे काम केले. त्यांनी चांगले आणि वाईट दोन्ही काळ पाहिले, पण कधीही हार मानली नाही.
Chetak Screen Awards 2026
मी जिथे कुठे जातो आणि ज्याला भेटतो, तिथे मला खूप प्रेम मिळते, कारण माझ्या वडिलांनी लोकांच्या मनात आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे."
‘मी कधीच विचार केला नव्हता की मी अशा प्रकारे इथे उभा राहीन’
पुढे बोलताना बॉबी म्हणाला, "लोक त्यांच्यावर इतके प्रेम करतात की त्यांनी आम्हाला कोणत्याही संकोचाशिवाय आपल्या हृदयात स्थान दिले. आज येथे उभे राहून मला असे वाटतेय की, मी घरी जाऊन त्यांना सांगावे की ‘पापा, तुम्ही येऊ शकला नाहीत म्हणून मी तुमचा पुरस्कार घेऊन आलो आहे.’
मी कधीच विचार केला नव्हता की मी अशा प्रकारे इथे उभा राहीन, पण अनंत गोयंका यांची इच्छा होती की मी इथे यावे. मी धर्मेंद्र यांचा मुलगा आहे, यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि देवाचा आभारी आहे. धन्यवाद, पापा, तुम्ही सर्वोत्तम आहात,” असे म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. Chetak Screen Awards 2026
दरम्यान, बॉलीवूडचे ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचं मागील वर्षी २४ नोव्हेंबर रोजी ८९ व्या वर्षी निधन झाले.

