Wednesday, 05 Aug, 5.05 am प्रभात

मुखपृष्ठ
चीन विरोधात कारवाई सुरूच: आणखी 2 ऍप्सला भारतात बंदी

नवी दिल्ली: गलवान संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्या सुरू झालेला तणाव अद्याप कायम आहे. एकीकडे चीनने सैन्य मागे घेतल्याचा दावा केला आहे तर दुसरीकडे भारताकडून हा दावा फेटाळून लावण्यात आला आहे. त्यातच आता सरकारने चिनी सर्च इंजिन बायडू आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबो भारतात बॅन केले आहेत. ब्लॉक करण्यात आलेल्या या दोन्ही ऍप्सचा समावेश चीनमधील सर्वाधिक लोकप्रिय ऍप्समध्ये होतो.

एका इंग्रजी माध्यमाच्या संकेतस्थळावर याविषयी माहिती दिली आहे. इंटररनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना हे दोन्ही ऍप्स ब्लॉक करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय, गुगलच्या प्ले-स्टोअर आणि ऍपलच्या ऍप स्टोअरमधूनही हे ऍप्स हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही अकाउंट होते. मात्र लडाख सीमेवरील धुमश्‍चक्रीनंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने चिनी ऍपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोदींनी हे अकाउंट बंद केले होते.

59 चिनी ऍप्स बॅन केल्यानंतर 27 जुलै रोजी सरकारने अजून 47 चिनी ऍप्स बॅन केले आहेत. दरम्यान, नव्याने बॅन करण्यात आलेल्या 47 ऍप्समध्ये बहुतांश क्‍लोनिंग 47 ऍपचा समावेश आहे. याशिवाय युजरची खासगी माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका यांच्या आधारे सरकार अजून काही चिनी ऍप्सवर कारवाई करण्याची शक्‍यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top