Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Crime News : 'या' माजी नगराध्यक्षासह 11 जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा; काय आहे प्रकरण?

Crime News : 'या' माजी नगराध्यक्षासह 11 जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा; काय आहे प्रकरण?

प्रभात 2 months ago

Dhule Crime News : धुळे शहरातील देवपूर परिसरात सात वर्षांपूर्वी घडलेल्या पाटील पिता-पुत्र दुहेरी हत्याकांड प्रकरणात सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. सत्र न्यायाधीश जयश्री पुलाटे यांनी माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांच्यासह 12 जणांना दोषी ठरवले असून एका आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.

यापैकी 11 आरोपींना न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

हे प्रकरण देवपूर येथील रावसाहेब पाटील आणि त्यांचा मुलगा वैभव पाटील यांच्या निर्घृण हत्येशी संबंधित आहे. 8 जून 2018 रोजी पूर्व वैमनस्यातून जमावाने धारदार शस्त्रांनी दोघांवर हल्ला करून त्यांची हत्या केली होती. या घटनेने त्या वेळी संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.

या प्रकरणात बाजीराव पवार यांच्यासह भूपेश वाल्मिक पाटील, हर्षद उर्फ दादू रवींद्र पाटील, जयराज शामकांत पाटील, ऋषिकेश शामकांत पाटील, दर्शन अंबादास परदेशी, भगवान नानाभाऊ आहीरे, संदीप उर्फ विक्की दिलीप वेळीस, अप्पा उर्फ अर्जुन भगवान आहीरे, गौरव बाजीराव पवार, भूषण बाबुराव कापकर आणि भूषण निंबा पगारे यांच्याविरोधात खून, पुरावे नष्ट करणे आणि आरोपींना मदत करणे अशा कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते.

तब्बल आठ वर्षांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने आज दोषींना शिक्षा सुनावली. या निकालाबाबत मृत रावसाहेब पाटील यांचे बंधू प्रशांत पाटील यांनी समाधान व्यक्त केले. न्यायालयाने एका आरोपीची निर्दोष मुक्तता केली असून आणखी एका आरोपीला कमी शिक्षा दिल्यामुळे त्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

2018 मध्ये घडलेल्या या दुहेरी हत्याकांडानंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. आज न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे न्यायव्यवस्थेवर असलेला विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना पाटील कुटुंबीयांनी व्यक्त केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat