Dailyhunt
Crop Damage : पुरंदरमध्ये निसर्गाचा तांडव! जेऊरमध्ये ६०% केळी भुईसपाट; शेतकऱ्याच्या कष्टावर फिरलं पाणी

Crop Damage : पुरंदरमध्ये निसर्गाचा तांडव! जेऊरमध्ये ६०% केळी भुईसपाट; शेतकऱ्याच्या कष्टावर फिरलं पाणी

प्रभात 2 weeks ago

Crop Damage - राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वार्‍यासह पावसाने पुरंदर तालुक्यातील जेऊर परिसराला मोठा फटका बसला असून केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अनेक शेतकर्‍यांचे काढणीस आलेले पीक वार्‍यामुळे कोसळल्याने सुमारे 60 टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुरंदर तालुका हा फळबाग आणि ऊस उत्पादनासाठी ओळखला जातो.

जेऊर व मांडकी परिसरातील शेतकर्‍यांनी अलीकडच्या काळात केळी लागवडीकडेही मोठ्या प्रमाणात वळण घेतले आहे. सुमारे साडेबारा एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या केळी पिकाला अवकाळी पावसासह सोसाट्याच्या वार्‍याचा मोठा फटका बसला आहे. वार्‍यामुळे केळीची झाडे उन्मळून पडली असून काढणीस आलेले घड जमिनीवर पडल्याने खराब होत आहेत.

दरम्यान, पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे यांनी जेऊर गावाला भेट देत नुकसानीची पाहणी केली. त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उत्तम धुमाळ, मंडल अधिकारी बापूसाहेब देवकर, ग्रामसेवक सुलोचना कदम, कृषी अधिकारी दिनेश धायगुडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शासनाची मदत तुटपुंजी
केळी पिकाला अद्याप फळबागेचा दर्जा मिळालेला नसल्याने शेतकर्‍यांना इतर पिकांप्रमाणेच हेक्टरी सुमारे 15 हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते. मात्र या पिकासाठी शेतकर्‍यांना वर्षभरात सुमारे 4 लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. यंदा निर्यातक्षम उत्पादन तयार झाले असताना सुमारे 20 रुपये प्रति किलो दराची अपेक्षा होती. मात्र आंतरराष्ट्रीय परिस्थिती व गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे केळी पिकाला फळबागेचा दर्जा देऊन विमा सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

“वादळ-पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान पूर्ण भरून निघणे कठीण असले तरी शासनाकडून शक्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.”
– अमित झेंडे, सभापती पुरंदर पंचायत समिती

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat