Dailyhunt
Crop Damage : रहिमतपूर परिसरात निसर्गाचा कोप; अवकाळीने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान

Crop Damage : रहिमतपूर परिसरात निसर्गाचा कोप; अवकाळीने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान

प्रभात 2 weeks ago

Crop Damage - दोन दिवसापूर्वी रहिमतपूर परिसरातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाने तडाखा दिला. यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उशिरा पेरणी झालेल्या व काढणीस आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा तसेच कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

तारगाव, वाठार किरोली परिसरातील अनेक शेतकरी टोमॅटो, काकडी, झेंडू सारख्या नगदी पिकांचे उत्पादन घेत असतात. याही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दोन दिवसात रहिमतपूर परिसरातील साप, वेळू, जयपुर, पिंपरी, आर्वी, वाठार किरोली, तारगाव या परिसरात सोसाट्याच्या वार्‍यासह प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. सलग दोन दिवस पाऊस पडल्यामुळे शेतकर्‍यांची धांदल उडाली. वर्षभर चारा पिकासाठी जमवण्यात आलेला अनेक शेतकर्‍यांचा ज्वारीचा कडबा भिजून गेला. अनेक शेतकर्‍यांची ज्वारी, गहू, हरभरा तसेच कांदा ही पिके काढणीस आली आहेत. परंतू जोरदार वार्‍यामुळे ही पिके जमिनीबरोबर भुईसपाट झाली आहेत.

पावसामुळे भिजून हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे. जोरदार पावसाने अनेक शेतकर्‍यांचे बांध फुटून माती वाहून गेली आहे. तारगाव, तोडणीस आलेले टोमॅटो पीक उपटून पडले आहे. आता पाऊस बंद झाला असला तरी शेतात साठलेल्या पाण्यामुळे शेतकर्‍यांना शेतीची कोणतीही कामे करता येत नाहीत. शासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा करून शेतकर्‍यांना मदत द्यावी, अशी मागणी रहिमतपूर परिसरातील शेतकर्‍यांमधून होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat