Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Daund News: दौंडमध्ये भलताच प्रकार! ५३ मोकाट जनावरे पकडली अन्. ठेकेदारावर थेट गुन्हा दाखल

Daund News - शहरातील मोकाट फिरणारी जनावरे (गाय, बैल) पकडून निश्चित केलेल्या गोशाळेत जमा करण्याबाबतच्या कामाचा ठेका दौंड नगरपालिकेने किरण डिस्ट्रीब्युटर्स या कंपनीला दिला होता. या ठेकेदाराने (दि.9) फेब्रुवारी 2026 ते (दि.16) फेब्रुवारी या कालावधीत शहरातील 53 जनावरे पकडून ती गोशाळेत जमा न करता त्यांचा अपहर केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी फिर्याद दिली आहे. दौंड पोलिसांनी किरण डिस्ट्रीब्युटर्स, प्रो. प्रा. किरण नितीन वांभिरे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दौंड नगरपालिकेकडून शहरात फिरणारी मोकाट जनावरे पकडून मान्यताप्राप्त गोशाळेत जमा करण्याबाबतच्या कामाचा ठेका किरण डिस्ट्रीब्युटर्स कंपनीला (दि.29) सप्टेंबर 2025 रोजी दिला होता.

त्या अनुषंगाने ठेकेदाराने मोकाट फिरणारे जनावरे पकडून गोशाळेत जमा करण्याचे कामास सुरुवात केली होती. ठेकेदाराने (दि.14) ऑक्टोबर 2025 ते (दि.29) जानेवारी या कालावधीमध्ये एकूण 174 जनावरे (गाय ,बैल) पकडून श्री बोरमलनाथ गोशाळा ट्रस्ट बोरीपार्धी, चौफुला व शिवशंभो शाळा ट्रस्ट ,पुणे येथे जमा केली. त्याबाबतचे आवश्यक ते दाखले जोडून त्याप्रमाणे नगरपालिकेकडे बिले सादर केली.

कागदपत्रांची पडताळणी करून नगरपालिकेने ठेकेदारास बिलांची रक्कम अदा केली. त्यानंतर किरण डिस्ट्रीब्युटर्स यांनी (दि.9) फेब्रुवारी ते (दि.16) फेब्रुवारी या कालावधीमध्ये शहरातील 53 जनावरे पकडून ते सुरक्षितरित्या गोशाळेत जमा केल्याचे जिओ टॅगिंग चे फोटो सोबत असणारे बिल (रक्कम 3 लाख 71 हजार नगरपालिकेकडे 16 फेब्रुवारी रोजी सादर केले होते.

त्यानुसार बिल मंजूर करण्यासाठी, जनावरे ज्या गोशाळेत दाखल केले त्याची पडताळणी करण्यासाठी ज्या गोशाळेत जनावरे जमा केली आहेत. त्या गोशाळेचा दाखला ठेकेदाराकडे मागितला असता त्यांनी तो दाखला सादर केला नाही. त्यामुळे नगरपालिकेने नोटीसीद्वारे ठेकेदाराकडे सदर कालावधीमध्ये गो शाळेत जमा केलेल्या जनावरांचा दाखला व इतर कागदपत्रांची मागणी केली.

परंतु ठेकेदाराने नोटीसला असमाधानकारक उत्तर देऊन अद्यापपर्यंत जनावरे जमा केलेला दाखला नगरपालिकेकडे सादर केलेला नाही. त्यामुळे या ठेकेदाराने जनावरे गोशाळेत जमा केले अगर कसे याबाबत नगरपालिकेला शंका निर्माण झाली आहे. ठेकेदार किरण डिस्ट्रीब्युटर्स यांनी (दि.9) फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये एकूण 53 गाय,

बैल जनावरे पकडून ते सुरक्षितरीत्या गोशाळेत जमा न करता त्यांच्याकडे दिलेले कंत्राट व त्यापोटी त्यांचेवर सोपविण्यात आलेला जनावरांचा कायदेशीर ताब्याचा गैरफायदा घेऊन ठेकेदाराने या 53 जनावरांचा गैर कायदेशीरपणे अपहार केला आहे अशी माहिती फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat