Dailyhunt
Dehu Road News : सिस्टीम डाऊन की मुजोरी? गॅस एजन्सीच्या कारभारावर ग्राहकांचा प्रचंड संताप

Dehu Road News : सिस्टीम डाऊन की मुजोरी? गॅस एजन्सीच्या कारभारावर ग्राहकांचा प्रचंड संताप

Dehu Road News - देहूरोड परिसरातील कोहली गॅस एजन्सीच्या कारभाराबाबत ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, विविध कारणे देत सेवा नाकारली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

केवायसी अपडेट नाही, बुकिंग झालेले नाही, सिस्टीम डाऊन आहे अशी कारणे देत ग्राहकांची वारंवार गैरसोय केली जात असल्याची तक्रार आहे. गॅस सिलेंडर बुकिंगसाठी फोन केल्यास प्रतिसाद मिळत नसल्याने अनेक ग्राहकांना प्रत्यक्ष एजन्सीत जावे लागत असून, तेथेही मोठ्या रांगा आणि गर्दीचा सामना करावा लागत आहे.

ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, बुकिंगबाबत विचारणा केल्यावर समाधानकारक उत्तर मिळत नाही. तसेच केवायसी अपडेट नाही या कारणावरून ग्राहकांना पुन्हा पुन्हा फेऱ्या माराव्या लागत असल्याचे सांगण्यात आले. काहींनी कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणूक मिळत असल्याची तक्रारही केली असून, यामुळे वादाच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, काही नागरिकांनी गंभीर आरोप करत, वापरात नसलेल्या किंवा मृत व्यक्तींच्या नावावर सिलेंडर बुकिंग करून ते काळ्या बाजारात विकले जात असल्याची शंका व्यक्त केली आहे.

तसेच बुकिंग झालेल्या सिलेंडरच्या वितरणातही विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच ग्राहकांना सुरळीत सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. याबाबत देहूरोड विभागीय तक्रार निवारण व विक्री अधिकारी किरण सिंकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat