Thursday, 29 Oct, 9.05 pm प्रभात

मुखपृष्ठ
देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने रुळावर - पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली - देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त गतीने परत रुळावर येत असून बाजारपेठा आणि बाजार शक्तींना नवा भारत मानतो, याचे स्पष्ट संकेत अलीकडच्या सुधारणांनी जगाला दिले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कामगार क्षेत्रात सरकारने नुकत्याच केलेल्या सुधारणांमुळे कारखानदारी आणि शेती, या दोन्ही क्षेत्राच्या वाढीला चालना मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले.

कारखानदारीच्या क्षेत्रात भारताला आघाडीचा देश बनवण्यासाठी सरकारने मजबूत पाया रचला आहे. त्यामुळे गेल्यावर्षी अमेरिकेतून भारतात 154 हरित क्षेत्र प्रकल्प आले आहेत. त्या तुलनेत चीनमधे 86, व्हिएतनाममध्ये 12, तर मलेशियात 15 प्रकल्प आले.

भारताबाबत जागतिक विश्‍वास सातत्याने वाढत असल्याचे हे निदर्शक आहे, असे मोदी म्हणाले. कॉर्पोरेट करातली कपात, कोळसा क्षेत्रात व्यावसायिक खनिकर्माचा प्रारंभ, अंतराळ क्षेत्र खासगी गुंतवणुकीसाठी खुले करणे, नागरी विमान वाहतुकीसाठीच्या हवाई मार्गांवरचे लष्करी निर्बंध उठवणे, इत्यादी उपाययोजनांमुळे आर्थिक वाढीला चालना मिळेल, असा विश्‍वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रावर भर दिल्यामुळे आर्थिक व्यवस्था पुनरुज्जीवित होईल आणि वाढीला लागेल. त्यासाठी सरकार सर्वतोपरी उपाययोजना करेल, असे त्यांनी सांगितले. सन 2024 पर्यंत पाच लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट कोविडचे संकट असूनही गाठता येईल, याबाबत आपण अजूनही आशावादी असल्याचे मोदी म्हणाले.

करोनावर लस आल्यानंतर देशातल्या प्रत्येक नागरिकाला ती दिली जाईल. एकही भारतीय यापासून वंचित राहणार नाही, लॉकडाऊन लागू करण्याची आणि लॉकडाऊन उठवण्याची वेळही योग्यच होती, असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top