Wednesday, 25 Sep, 10.55 am प्रभात

शीर्ष बातम्या
देशमुख X भाजप लढणार सामना

विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नांनी आणि मांजरा नदीमुळे 'सुपीक' झालेला मतदारसंघ म्हणजे लातूर ग्रामीणचा. मांजरा, रेणा, विकास या साखर कारखान्यांमुळे लातूर ग्रामीणच्या अर्थकारणात काही अंशी प्रगती झाली आहे. विलासराव देशमुख यांनी कोणताही उमेदवार दिला, तरी या मतदासंघातून निवडून येईल अशी परिस्थिती होती. पण, आता विलासरावांचे वारसदार अमित देशमुख यांचे लातूर शहरप्रमाणे या मतदारसंघावरील लक्ष कमी झाले आहे. तर, त्यांचे बंधू धीरज देशमुख हे यावेळी लातूर ग्रामीणमधून निवडणूक लढण्याची चर्चा आहे. तर, भाजपकडून अजूनही सक्षम उमेदवाराचा शोध सुरू आहे. त्यामुळे मतदार कोणाला पाठिंबा देतात, हे पाहणे महत्त्चाचे आहे.

2009मध्ये पुनर्रचनेत लातूर ग्रामीण मतदारसंघाची निर्मिती झाली. त्यावेळी विलासदाराव देशमुख यांनी येथून वैजनाथ शिंदे यांना उमेदवारी दिली. ते निवडूनही आले. प्रचाराच्या केंद्रस्थानी विकासाचा मुद्दा होताच. शिवाय 'विलासराव' हे मोठे नावदेखील होते. त्यानंतर 2014मध्ये त्र्यंबक भिसे हे येथून निवडून आले. राज्यभरात भाजप आणि शिवसेनेची लाट असताना लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या दोन्ही मतदारसंघांनी विलासराव देशमुख यांच्यावरील श्रद्धेपोटी कॉंग्रेसच्या उमेदवारांना विजयी केले. त्यावेळी भाजपकडून रमेश कराड यांनीदेखील नव्वद हजारांवर मते मिळविली. पण, आता वातावरण बरंच बदललं आहे. दुसऱ्या बाजूला विचार केला, तर धीरज देशमुख हे स्वतः या मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यामुळे शिंदे आणि भिसे यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे लातूर शहर-अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण धीरज देशमुख असे उमेदवार कॉंग्रेसकडून दिले जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सतरंज्याच उचलायच्या का, असा प्रश्‍न निर्माण केला जात आहे. निवडणुकीत याच विषयावरून कॉंग्रेसला फटका बसण्याची शक्‍यता आहे.

या मतदारसंघात मराठा, वंजारी, बंजारा आणि लिंगायत समाज संख्या मोठ्या प्रमाणात आहे. साखर कारखाने आणि विविध कार्यकारी सोसायट्यांवर कॉंग्रेसचं वर्चस्व आहे. रेणा, विकास आणि मांजरा साखर कारखान्याचं प्रशासन आणि रोखीच्या व्यवहाराने देशमुखांची बाजू भक्कम मानली जात आहे. मात्र, मागील काही वर्षातल्या सततच्या दुष्काळामुळे सहकार क्षेत्रातील अर्थकारणाला तडे जात आहेत. पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न बिकट आहे. साखर कारखान्यांशिवाय अन्य उद्योग व्यवसाय नसल्याने आर्थिक स्तर वाढत नाही. पाण्याअभावी शेतीतून इतर उत्पदान आणि उत्पन्न नाही. यामुळे या भागात असंतोष वाढत आहे. याचा लाभ भाजप मिळवेल का, हा प्रश्‍न आहे. लातूर ग्रामीणसारख्या मतदारसंघात भाजपकडे सक्षम उमेदवाराचा अभाव आहे. तरीही, पंकजा मुंडे यांच्या इच्छाशक्तीवर विजयाचं समीकरण आणि बरंच काही अवलंबून आहे.

बाकी, लातूर शहरप्रमाणे ग्रामीण मतदारसंघातही विकास, उद्योग, बेरोजगारी, पाणीटंचाई, शिक्षण, स्थलांतरण हे मुद्दे येथेही कायम असले, तरी हा मतदारसंघ भावनेच्या राजकारणाला कौल देतो हा इतिहास आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat
Top