Dailyhunt
Digital Arrest : तुमचा नंबर दहशतवाद्यांकडे? ८४ वर्षीय आजींना ९७ लाखांचा गंडा; सायबर भामट्यांचा थरारक बनाव

Digital Arrest : तुमचा नंबर दहशतवाद्यांकडे? ८४ वर्षीय आजींना ९७ लाखांचा गंडा; सायबर भामट्यांचा थरारक बनाव

प्रभात 3 weeks ago

Digital Arrest - सायबर चोरट्याने स्वतःला पोलीस निरीक्षक असल्याचे सांगून, तुमच्या नावावरचा मोबाईल क्रमांक जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्यात आढळल्याचा खोटा दावा करून ८४ वर्षीय महिलेची ९७ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी कॅम्प परिसरात राहणाऱ्या ८४ वर्षीय महिलेने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ही घटना २७ मार्च ते ७ एप्रिल २०२६ या कालावधीत घडली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुमचा मोबाईल नंबर दहशतवाद्यांकडून आढळून आला आहे, असे सांगण्यात आले. याचा तपास 'आरबीआय'कडून केला जात असल्याचा बनाव करून पैसे जमा करण्यासाठी दबाव टाकण्यात आला.

अटकेची भीती दाखवत तक्रारदाराला त्यांच्या दोन बँक खात्यांमधून ९७ लाख ४७ हजार रुपये आरोपींनी दिलेल्या खात्यांमध्ये भरण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संगीता देवकाते करीत आहेत.

६३ वर्षीय व्यक्तीची फसवणूक २९ लाखांची फसवणूक
सायबर चोरट्यांनी 'ब्ल्यू डार्ट इंटरनॅशनल कुरिअर'मधून बोलत असल्याचे सांगून, तुमच्या नावाने मुंबईहून बँकॉकला पाठवलेल्या पार्सलमध्ये पासपोर्ट, एटीएम कार्ड, लॅपटॉप आणि एमडीएमए ड्रग्ज आढळल्याचा बनाव केला. त्यानंतर स्वतःला मुंबई सायबर सेलचे अधिकारी असल्याचे सांगून अटकेची भीती दाखवली.

'सीबीआय', 'सुप्रीम कोर्ट' आणि 'रिझर्व्ह बँक' यांच्या नावाने बनावट कागदपत्रे पाठवून खात्यांची पडताळणी करण्याच्या नावाखाली २९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी एका ६३ वर्षीय व्यक्तीने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat