Dailyhunt
डीजेची वरात थेट पोलिसांच्या दारात

डीजेची वरात थेट पोलिसांच्या दारात

प्रभात 4 years ago

निमोणे - शिंदोडी (ता. शिरुर) येथे सोमवारी (दि. २५) शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीनंतर सायंकाळी निवड झालेल्या काही सदस्यांची गावातुन डीजेच्या तालावर वरात काढली.

तसेच यावेळी गर्दी जमविल्याप्रकरणी गावकामगार तलाठी विजय बेंडभर यांनी याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यामुळे शिंदोडी गावच्या सरपंचासह नऊ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
शिंदोडी गावची डिजेची वरात थेट पोलीस ठाण्याच्या दारात पोहोचल्याची चर्चेला सर्वत्र उधाण आले आहे.

शिंदोडी गावात १५ दिवसांपूर्वी करोनाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सध्या गावात करोनाचे दोन ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सोमवारी येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती निवडीच्या वेळेस गर्दी होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी शिरुरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना दोन पोलीस कर्मचारी पाठवावेत अशी मागणी केली होती. पोलीस कर्मचारी आल्याने निवड प्रकिया शांततेत पार पडली. परंतु रात्री काही उत्साही कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर थिरकत निवडून आलेल्या सदस्यांची मिरवणूक काढली. यावेळी सोशल डिस्टन्सचा पुर्णपणे फज्जा उडाला. तसेच गावच्या सरपंचासह काही सदस्यांनीही डिजेच्या तालावर ठेका धरला. त्या व्हिडीओचा सोशल मीडियावर मोठया प्रमाणात बोलबाला झाला.

याप्रकरणी शिंदोडी गावचे सरपंच अरुण खेडकर, शिवम वाळुंज, इंद्रभान ज्ञानदेव ओव्हाळ, राजेंद्र खेडकर, शरद ओव्हाळ, अजित ओव्हाळ, दादासो चोरमले, अनिल पोपळघट, अनिल ओव्हाळ यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास पोलीस नाईक धनंजय थेऊरकर करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Dainik Prabhat