Dilip Mahadu Gavit Wins Gold Medal 100m T47 Glasgow CWG 2026 : स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Glasgow Commonwealth Games 2026) महाराष्ट्राच्या मातीतील एका जिद्दी खेळाडूने जागतिक स्तरावर देशाचा झेंडा फडकवला आहे.
नाशिकच्या दिलीप महादू गावित (Dilip Mahadu Gavit) याने पुरुषांच्या १०० मीटर टी४७ (100m T47) पॅरा ॲथलेटिक्स शर्यतीत १०.७१ सेकंदाचा नवा गेम्स रेकॉर्ड (Games Record) प्रस्थापित करत सुवर्णपदक (Gold Medal) जिंकले आहे. याच शर्यतीत भारताच्या मोहम्मद बासिलने रौप्य पदक जिंकल्यामुळे भारताने या प्रकारात ऐतिहासिक ‘१-२ फिनिश’ नोंदवली.
पाचव्या वर्षी अपघात अन् कोपरापासून हात कापला!
नाशिक जवळील ‘तोरण डोंगरी’ या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दिलीपचा हा सुवर्णप्रवास डोळ्यात पाणी आणणारा आहे. वयाच्या अवघ्या ५-६ व्या वर्षी झाडावरून पडल्याने त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. गावात वैद्यकीय सुविधा नसल्याने जखमेत गँग्रीन (Gangrene) पसरले आणि डॉक्टरांना त्याचा हात कोपराच्या खालून कापावा लागला. मात्र, एका हाताचे अपंगत्व आणि गरिबीला त्याने स्वतःची कमजोरी बनू दिले नाही.
सामान्य खेळाडूंना दिलेले आव्हान!
गावच्या कच्च्या रस्त्यांवर धावणाऱ्या दिलीपची प्रतिभा प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी ओळखली आणि त्याचा सुरुवातीचा खर्च उचलला. दिलीपची सर्वात मोठी खासियत म्हणजे, सुरुवातीला त्याला पॅरा (दिव्यांग) स्पर्धांमध्ये खेळायचेच नव्हते. त्याने सामान्य खेळाडूंसोबत स्पर्धा करत अंडर-१८ राष्ट्रीय स्पर्धेच्या २०० मीटर फायनलपर्यंत धडक मारली होती. ‘खेलो इंडिया’मध्ये महाराष्ट्राच्या ४×१०० मीटर रिले संघातून त्याने पदकही जिंकले होते.
४०० मीटर सोडून १०० मीटरमध्ये रचला इतिहास!
दिलीप गावित हा मूळचा ४०० मीटरचा धावपटू आहे. मात्र, २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ४०० मीटरचा इव्हेंट समाविष्ट नसल्याने त्याने १०० मीटरसाठी स्वतःला तयार केले. ग्लास्गोमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसात आणि प्रचंड थंडीतही दिलीपचा वेग कमी झाला नाही. त्याने १०.७१ सेकंदात अंतर कापत सुवर्ण रेकॉर्ड बनवला. हांगझोउ आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताला ऐतिहासिक १०० वे पदक मिळवून देणारा दिलीप आता या वर्षात जगातील नंबर-१ पॅरा धावपटू बनला आहे.
विजयानंतर दिलीप म्हणाला, “माझा फोकस आता फक्त पदकांवर आहे, नोकरीवर नाही. माझे पुढील लक्ष्य लॉस एंजेलिस २०२८ पॅरालिम्पिक आहे.”

