Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी जर्मनीमधून आणखी सैन्य माघारी बोलावण्याचे संकेत दिले आहेत. जर्मनीचे चान्सेलर फेड्रीक मर्झ यांच्याबरोबर ट्रम्प यांचे मतभेद झाल्यानंतर अलिकडेच पेटॅगॉनने जर्मनीतून अमेरिकेचे ५ हजार सैनिक मागे घेण्याचे जाहीर केले आहे.
याशिवाय आणखी सैनिक मागे घेतले जातील, असे ट्रम्प यांनी आज म्हटले आहे. मात्र त्यामागील कोणतेही कारण त्यांनी दिले नाही.जर्मनीतून ५ हजार सैनिक मागे घेण्याचा ट्रम्प प्रशासनाचा (Donald Trump) निर्णय अपेक्षितच होता, असे जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरीस पिस्टोरियस यांनी म्हटले आहे.
ही धमकी ट्रम्प अनेक दिवसांपासून देत होते. युरोपातले देश आपल्या स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतः च घेण्याची गरज आहे, युरोपमध्ये, आणि विशेषतः जर्मनीमध्ये, अमेरिकन सैनिकांची उपस्थिती आमच्या आणि अमेरिकेच्या हिताची आहे, असेही ते म्हणाले.
मात्र अटलांटिक क्षात्रातील देशांबरोबर सुरक्षा भागीदारी कायम राखणे गरजेचे आहे, यावरही त्यांनी भर दिला. जर्मनीतून सैन्य माघारी घेण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयावर डेमोक्रॅटिक सदस्यांसह रिपब्लिकन सदस्यांनीही टीका केली आहे. सैन्य मागे घेतल्यामुळे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यासाठी एक चुकीचा संदेश दिला जाईल, असे अनेक संसद सदस्यांनी म्हटले आहे.
इराण युद्धात अमेरिकेची (Donald Trump) साथ न दिल्याबद्दल जर्मनीचे चान्सेलर फड्रीक मेर्झ, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यासारख्या नेत्यांवर ट्रम्प नाराज आहेत. त्यातच इराणचे नेतृत्व वाटाघाटींमध्ये अमेरिकेचा अपमान करत असल्याचे मर्झ म्हणाले होते, त्यामुळे ट्रम्प संतापले आहेत.

